सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यासक्रम; परळ येथे तीन महिन्यांत शुभारंभ
‘आपत्कालीन व्यवस्थापन’ या विषयाबाबत सर्वसामान्य नागरिक आणि शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईत परळ येथे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचे सर्व नियोजन पूर्ण झाले असून येत्या २ ते ३ महिन्यांत हे केंद्र सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाचे प्रमुख महेश नार्वेकर यांनी ‘लोकसत्ता’ला दिली.
आपत्कालीन व्यवस्थापन ही फक्त महापालिका किंवा अन्य शासकीय यंत्रणांची जबाबदारी नसून यात प्रत्येक नागरिकाचाही सहभाग असणे अत्यावश्यक आहे. एखादी दुर्घटना घडल्यानंतर किंवा आपत्ती कोसळल्यानंतर आपत्कालीन व्यवस्थापन करून उपयोग नाही. अशा घटनांमध्ये नागरिकांनी काय केले पाहजे, त्यांची जबाबदारी काय, याविषयी आपल्याकडे फारशी शास्त्रशुद्ध माहिती नाही. काही अपवाद वगळता अशा घटनांमध्ये नागरिक आपल्याला पाहिजे तसे आणि पाहिजे तशा प्रकारे मदत करत असतात. आपत्कालीन व्यवस्थापनाचे योग्य ते प्रशिक्षण मिळावे, असा उद्देश यामागे आहे. महापालिका आयुक्त अजय मेहता यांची संकल्पना आणि मार्गदर्शनाखाली हे केंद्र काम करणार असल्याचे नार्वेकर म्हणाले.
परळ येथे चार मजली इमारत तयार असून तेथे हे केंद्र असणार आहे. एखादी दुर्घटना किंवा आपत्तीमध्ये शासकीय व निमशासकीय यंत्रणेबरोबरच सर्वसामान्य नागरिक, प्रसारमाध्यमे, रुग्णालये, डॉक्टर्स, रक्तपेढय़ा, अग्निशमन दल आणि अशा अनेकांचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संबंध येत असतो. या सगळ्यांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या आपत्ती आणि त्यात करण्याची कामे याच्या आराखडय़ाबरोबरच आपत्कालीन व्यवस्थापनाचा सर्वकष अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्या अभ्यासक्रमानुसार या केंद्रात प्रशिक्षण दिले जाणार आहे. अभ्यासक्रमासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून येथे सर्वसामान्य नागरिकांनाही प्रशिक्षण घेता येणार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले.
या केंद्रात एक थ्रीडी थिएटर उभारण्याची सूचना महापालिका आयुक्त मेहता यांनी केली असून येथे सुनामी महाप्रलय, किल्लारी भूकंप आणि अन्य दुर्घटना व आपत्तींमध्ये केलेल्या कामाच्या ध्वनिचित्रफिती दाखविण्यात येणार आहेत. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांनी विशेषत: तरुण पिढीने आपत्कालीन व्यवस्थापन हा विषय शिकून घ्यावा, असा आमचा प्रयत्न आहे. शाळा आणि महाविद्यालयातून वेगवेगळे ‘डे’ साजरे केले जातात. यात ‘आपत्कालीन दिन’ साजरा केला जावा. या निमित्ताने व्याख्याने, चर्चा, स्पर्धा, ‘मॉक ड्रिल’ आदी कार्यक्रम आयोजित केले जावेत, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले.