वास्तुविशारदामार्फत अर्ज करावा लागणार; पालिकेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध

राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार महापालिकेने मुंबईमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधितांना आवश्यक त्या कागदपत्रांसह नोंदणीकृत वास्तुविशारदामार्फत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी अर्ज करावा लागणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती मिळून लाखो रहिवाशांना त्याचा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. त्यासाठी पालिकेच्या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्ध करण्यात येणार आहे.

मुंबईमध्ये मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहेत. अनेक विकासकांनी पालिकेकडे सादर केलेल्या आराखडय़ात फेरबदल करून बांधकामे केली आहेत. याची कल्पना नसल्यामुळे रहिवाशांनी घराचा ताबाही घेतला आहे. गेली अनेक वर्षे रहिवासी या इमारतींमध्ये वास्तव्य करीत आहेत. बहुतांश इमारतींना निवासी दाखला मिळालेला नाही. त्यामुळे या इमारतींना व्यावसायिक दराने पाणी मिळत आहे. विकासकाने केलेल्या चुकीचा फटका असंख्य रहिवाशांना बसत आहे. वरळी येथील ‘कॅम्पा कोला’मधील रहिवाशांनी व्यावसायिक दराऐवजी निवासी दराने पाणीपुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडे अर्ज केला होता. मात्र ‘कॅम्पा कोला’मध्ये नियमापेक्षा अधिक बांधकाम केल्याचे उघडकीस आल्यामुळे या इमारतीमधील मजले तोडण्याची कारवाई पालिकेकडून करण्यात येणार होती. मात्र विकासकाने केलेल्या चुकीमुळे रहिवासी बेघर होऊ नये यासाठी सरकारने हस्तक्षेप करीत कारवाई रद्द करण्यास पालिकेला भाग पाडले होते. असे अनेक प्रकार मुंबईत घडले असून विकासकाच्या चुकीमुळे असंख्य रहिवासी बेघर होऊ नयेत यासाठी राज्य सरकारने ३१ जानेवारी २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे शुल्क आकारणी करून नियमित करण्याची घोषणा केली होती. इतकेच नव्हे तर या संदर्भात अधिसूचनाही जारी करण्यात आली.

शुल्क स्वीकारून कोणती अनधिकृत बांधकामे नियमित करता येऊ शकतात याबाबतची माहिती राज्य सरकारने अधिसूचनेमध्ये नमूद किली आहे. त्यानुसार पात्र अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी संबंधितांना अर्ज सादर करण्याचे आवाहन लवकरच पालिकेकडून करण्यात येणार आहे. ही अनधिकृत विकासकामे प्रशमन शुल्क (कम्पाऊंडेड चार्जेस) आणि प्रस्तावानुसार नियमामध्ये नमूद केलेली अन्य शुल्कांची आकारणी करून नियमित करण्यात येणार आहेत.

मुंबईतील अनधिकृत बांधकामे शुल्क स्वीकारून नियमित करण्यासाठी पालिका प्रशासनाने अर्ज तयार केले असून हे अर्ज पालिकेच्या htpp://autodcr.mcgm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह इमारत प्रस्ताव विभागातील दुय्यक अभियंत्यांकडे नियुक्त करण्यात आलेल्या अनुज्ञाप्तीधारक वास्तुविशारदामार्फत पालिकेच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज सादर करण्याची तारीख आणि तो कधीपर्यंत सादर करावा याबाबतची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र यामुळे मुंबईमधील असंख्य अनधिकृत बांधकामे नियमित होण्याचा मार्ग मोकळा होणार असून त्यामुळे असंख्य रहिवाशांना दिलासा मिळू शकेल, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.