पालिकेचा निर्णय; दिशादर्शक फलकांचे काम वॉर्ड कार्यालयांकडे

वारंवार चर खणून रस्ते खराब होत असल्याने एका रस्त्यावर वर्षांतून एकदाच चर खणण्यासाठी पालिकेकडून परवानगी देण्यात येणार आहे. वारंवार चर खणण्यास प्रतिबंध बसण्यासाठी केलेल्या उपायांनुसार दुसरा चर खणण्याच्या परवानगीसाठी थेट आयुक्त पातळीवर अर्ज करावा लागेल. त्याचप्रमाणे शहरातील सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावले जाणार असून रस्ते विभागाऐवजी हे काम वॉर्ड कार्यालयांकडे सोपवण्यात आले आहे.

नव्याने काम केलेल्या रस्त्यांवरही सातत्याने मोबाइल नेटवर्क, विद्युतवाहिनी, गॅसवाहिनी अशा विविध कामांसाठी चर खणले जातात. त्यामुळे रस्ते लवकर खराब होऊन पावसाळ्यात खड्डे पडतात. हे टाळण्यासाठी रस्त्यांवरील चर खोदण्याच्या परवानगीची प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. ऑनलाइनवरून आतापर्यंत सहा हजार अर्ज आले असून हे सर्व अर्ज पावसाळ्यापर्यंत केल्या जाणाऱ्या कामांसंदर्भात आहेत. एकाच रस्त्यावर वारंवार चर खोदले जाऊ नयेत यासाठी या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. एखाद्या रस्त्यावर एकापेक्षा जास्त कंपन्यांकडून चर खणण्यासाठी परवानगी मागण्यात आली असेल तर सर्व कंपन्यांना एकाच कालावधीमध्ये रस्ते खणण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांना केली आहे. त्याचप्रमाणे एखादा रस्ता पहिल्यांदा खोदण्याची परवानगी वॉर्ड पातळीवर देण्यात येणार असून त्याच ठिकाणी दुसऱ्यांचा चर खणण्यासाठी थेट आयुक्तांकडेच परवानगी मागावी लागेल. त्यामुळे एकाच रस्त्यावर वारंवार चर खणण्याला प्रतिबंध बसेल.

शहरातील सर्व रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावण्याचे आदेश आयुक्तांनी काही महिन्यांपूर्वी दिले होते. मात्र त्याबाबत अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही. दिशादर्शक फलक लावण्याचे काम रस्ते व वाहतूक विभागाकडून केले जाते. मात्र स्थानिक पातळीवर नेमके कुठे फलक लावणे गरजेचे आहे ते वॉर्ड कार्यालयांना माहिती असल्याने हे काम त्यांच्याकडेच सोपवण्यात आले आहे.