पेशावर येथे शाळांमधील मुलांवर झालेल्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर मुंबईच्या पालिका शाळांमध्येही सीसीटीव्ही लावण्याचा विचार केला जात आहे. या कॅमेऱ्यांमुळे इतर समाजविघातक घटनांवरही देखरेख ठेवता येऊ शकेल, असा विचार पालिकेच्या शिक्षण समितीकडून केला जात आहे.
गोवंडी येथील एका शाळेत गैरप्रकार होत असून त्यावर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही लावण्याची मागणी शिक्षण समिती सदस्यांकडून काही महिन्यांपूर्वी करण्यात आली होती. त्यासंबंधी प्रशासनाकडून नुकतेच उत्तर देण्यात आले. मात्र या दरम्यान पेशावर येथे शाळेतील मुलांवर झालेल्या हल्ल्यानंतर पालिका शाळांमध्येही सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत विचार व्हावा, अशी मागणी मंगळवारच्या शिक्षण समिती बैठकीदरम्यान झाली. याबाबत विचार करण्यात येत असून तो कितपत व्यवहार्य आहे याची चाचपणी झाल्यावरच औचित्याचा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार म्हणाले.
निवृत्तीवेतनाचा मार्ग मोकळा
विविध कारणांसाठी खासगी शाळांमधील शिक्षकांच्या रखडलेला निवृत्तीवेतनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. किरकोळ कारणांसाठी अडकवून ठेवण्यात आलेल्या शिक्षकांचे निवृत्तीवेतन तातडीने द्यावे याबाबत शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांनी तीन महिन्यापूर्वीच्या बैठकीत प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना तंबी दिली होती. त्यानंतर शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रखडलेल्या निवृत्तीवेतनाची समस्या तातडीने मार्गी लावली.