आंबोली येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातला मुख्य साक्षीदार असलेल्या अविनाश बालीचा मृतदेह अंधेरीतल्या एमआयडीसीमध्ये सापडला आहे. २०११ मध्ये एक दुहेरी हत्याकांड घडले होते. या दुहेरी हत्याकांडात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता. त्याने या प्रकरणात शेवटपर्यंत त्याची साक्ष बदलली नव्हती. त्याने दिलेल्या साक्षीमुळेच या प्रकरणातल्या चार आरोपींना २०१६ मध्ये शिक्षा सुनावण्यात आली होती.

काय होते प्रकरण?

ऑक्टोबर २०१३ मध्ये किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांची हत्या करण्यात आली. ही हत्या चार जणांनी केली होती. जितेंद्र राणा, सतीश सुलाह, सुनील बोध आणि दीपक पिवल अशी या चौघांची नावे होती. या चौघांनी किनान सॅन्टोस आणि रियुबन फर्नांडिस या दोघांनाही चाकू हल्ला करून ठार केले. या दोघांवरही अनेक वार करण्यात आले होते. हे दोघेही गंभीर जखमी असताना त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. किनानचा मृत्यू या घटनेनंतर रूग्णालयात दाखल करतानाच झाला, तर रियुबनचा मृत्यू रूग्णालयात उपचार घेताना काही दिवसांनी झाला. या प्रकरणात अविनाश बाली हा मुख्य साक्षीदार होता.

अविनाश बालीने दिलेल्या साक्षीवरूनच २०१६ मध्ये दुहेरी हत्याकांड प्रकरणात चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आता याच अविनाश बालीचा मृतदेह अंधेरी एमआयडीसीमध्ये सापडला आहे. या प्रकरणातला पुढील तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.