बोरिवली, कांदिवलीत शिबिरांद्वारे नागरिकांची फसवणूक

मुंबई :  कांदिवलीतील ‘हिरानंदानी हेरिटेज’ गृहसंकुलात बोगस लसीकरण शिबिराच्या माध्यमातून फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर बोरिवली आणि कांदिवली भागांत आणखी काही सोसायट्यांमध्ये खासगी रुग्णालयांचे नाव वापरून बोगस शिबिरे झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलाच्या तक्रारीनुसार पोलीस आणि पालिकेने चौकशी सुरू केली आहे.

खासगी रुग्णालयांना गृहसंकुलामध्ये लसीकरणाची परवानगी देण्यात आल्यानंतर सोसायट्या पुढाकार घेऊन लसीकरण शिबिरे आयोजित करीत आहेत. मात्र पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक असताना ती न घेताच काही संकुलांमध्ये लसीकरण केले जात आहे. या शिबिरांत लस घेतल्यानंतर प्रत्यक्षात त्याची कुठेही नोंद झालेली नाही. तसेच रुग्णालयांनीही त्यांच्या नावे दिलेली प्रमाणपत्रे नाकारली. कांदिवलीतील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकु लात हा प्रकार समोर आल्यानंतर आता इतरही सोसायट्यांमधून अशा स्वरूपाच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणाची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत हे शोधण्याचे आव्हान पालिका आणि पोलिसांसमोर आहे.

आम्ही लसीकरण घोटाळ्याची तक्रार के ल्यानंतर आता बोरिवली, कांदिवली भागांतील काही गृहसंकुलांनी आमच्याशी संपर्क साधला आहे, असे हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलातील रहिवासी हितेश पटेल यांनी सांगितले.

आयोजक कोण?

हिरानंदानी हेरिटेजमध्ये तीन गृहसंकुले असून यात ४३५ घरे आहेत. यातील १८ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण आयोजित करण्यात आले होते. लसीकरण करण्यासाठी कोकिळाबेन रुग्णालयातील विक्रेता प्रतिनिधी असल्याचा दावा केलेला पांडे, समन्वयक संजय गुप्ता आणि महेंद्र सिंग यांनी हे लसीकरण आयोजित केले होते.

चौकशी सुरू… लस घोटाळ्याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी चौकशी सुरू के ली आहे. पोलीस उपायुक्त विशाल ठाकू र यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण समोर आल्यानंतर लसीकरण आयोजित करणाऱ्यांसह गृह-संकुलातील रहिवाशांकडे चौकशी के ली जात आहे. त्याआधारे योग्य ती कारवाई के ली जाईल. या प्रकरणी अद्याप गुन्हा नोंद झालेला नाही. तसेच कोणालाही ताब्यात घेण्यात आलेले नाही.

प्रकार काय?

कांदिवली येथील हिरानंदानी हेरिटेज गृहसंकुलात ३९० जणांचे खासगीरीत्या लसीकरण ३० मे रोजी केले गेले. एका मात्रेसाठी १२६० रुपये याप्रमाणे गृहसंकुलाने सुमारे पाच लाख रुपये संबंधितांना लसीकरणासाठी दिले. लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी नागरिकांना विविध रुग्णालयांची प्रमाणपत्रे आली. शंका आल्याने नागरिकांनी या रुग्णालयांकडे चौकशी केल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीसात तक्रार दाखल केली.