मुंबई : गेल्या वर्षी टाळेबंदीदरम्यान राज्य सरकारच्या करोना हाताळण्याच्या धोरणाबाबत समाजमाध्यमावरून टीका करणाऱ्या नवी मुंबईतील महिलेवर मुंबईच्या सायबर विभागाने दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केला. या महिलेच्या ट्वीटमध्ये दोन धर्म वा समुदायांमध्ये तेढ करणारे भाष्य केलेले नाही, असेही न्यायालयाने गुन्हा रद्द करताना म्हटले.

नवी मुंबईस्थित सुनैना होले या महिलेच्या ट्वीटमध्ये कोणत्याही समुदायाचा उल्लेख केलेला आणि त्यामुळे याकडे विवेकपूर्ण व्यक्तीच्या परिप्रेक्ष्यातून या प्रकरणाकडे पाहायला हवे, असेही न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने नमूद केले. होले हिने सायबर पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यासाठी अ‍ॅड्. अभिनव चंद्रचूड यांच्यामार्फत उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

याचिकाकर्तीच्या ट्वीटमुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी घेतलेल्या प्रयत्नांबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले. मात्र या ट्वीटमधून गुन्हा घडल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यात येत असल्याचे न्यायालयाने निकालपत्रात स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या ट्वीटबाबतही याचिकाकर्तीवर आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आपण राज्य सरकारच्या धोरणाबाबत मत व्यक्त केले होते. मात्र अशा पद्धतीने अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली जाऊ शकत नाही, असा दावा याचिकाकर्तीने केला होता. त्यावर सार्वजनिक पदी कार्यरत व्यक्तीने अशा प्रकारची टीका सहन करण्याची तयारी ठेवायला हवी, अशी टिप्पणी न्यायालयाने सुनावणीच्या वेळी केली होती.