मुंबई : बॉम्ब निकामी करण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या मुंबई विभागात पहिल्यांदाच बॉम्बशोधक व नाशक पथक दाखल केले जाणार आहे. २० सप्टेंबरला या नवीन सुरक्षा यंत्रणेचे उद्घाटन करण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा दलाने दिली.

एखादी बॉम्बसदृश वस्तू रेल्वे स्थानक आणि हद्दीत आढळल्यास किंवा बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी नियंत्रण कक्षात आल्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाची एकच धावपळ उडते. अशा वेळेस बॉम्ब शोधण्यासाठी किंवा निकामी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाला मुंबई पोलिसांची मदत घेण्याशिवाय पर्याय नसतो. मध्य रेल्वे सुरक्षा दलाकडे सध्या श्वान पथक आहे, मात्र बॉम्ब शोधक-नाशक पथक नाही. त्यामुळे यात बराच वेळ जातो. पश्चिम रेल्वेकडेही सध्या अशी सुरक्षा यंत्रणा नाही.

मुंबई उपनगरीय रेल्वेचा आवाका पाहता स्वतंत्र बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त के. के. अशरफ यांनी सांगितले. यात एका वाहनामध्ये सर्व यंत्रणा सज्ज असेल. यात दोन श्वान, एक बॉम्ब सूट, ब्लँकेटसह अन्य सुरक्षा यंत्रणांचा समावेश असतो. हे वाहन सुरक्षा कर्मचाऱ्यांसह कर्नाक बंदर येथे उभे केले जाईल. यासाठी आतापर्यंत आठ जणांचे प्रशिक्षण झाले असून आणखी बारा जणांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.