पालिका, बॉम्बे जिमखान्यातील वादात जिल्हाधिकाऱ्यांचीही उडी

महात्मा गांधी मार्गावरील पदपथाचा वाहनतळासाठी वापर करण्यावरून महापालिका आणि बॉम्बे जिमखान्यामध्ये जुंपली असतानाच आता या वादात जिल्हाधिकाऱ्यांनीही उडी घेतली आहे. जिमखान्याला वाहनतळाकरिता दिलेल्या परवानगीची मुदत संपुष्टात आल्याचे कारण देत पालिकेने या ठिकाणी जिमखान्याला वाहने उभी करण्यास मज्जाव केला आहे. परंतु, ही जमीन मुळातच सरकारची असून राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय त्या पदपथाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाने पालिकेला बजावले आहे.

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत सीएसटीचे सुशोभीकरण करण्यासाठी फेरीवाल्यांचे महात्मा गांधी मार्गावरील वाहनतळाच्या जागेत स्थलांतर करण्यात येणार होते. परंतु आता जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या पत्रामुळे फेरीवाल्यांच्या स्थलांतराला आणि पर्यायाने सुशोभीकरणालाही खो बसण्याची चिन्हे आहेत. हजारीमल सोमाणी मार्गाच्या विस्तारासाठी जिमखान्यातील काही जागेची आवश्यकता आहे.

महात्मा गांधी मार्गावरील आझाद मैदानातील भूकर क्रमांक ७३० व १/७३० ही जागा महसूल विभागाच्या अखत्यारीत असून ती भाडेपट्टय़ाने बॉम्बे जिमखान्याला देण्यात आली आहे. जिमखान्याला दिलेल्या या जागेबाबतचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. लगतच्या पदपथावर सभासदांना वाहने उभी करता यावी म्हणून जिमखान्याने काही वर्षांपूर्वी पालिकेकडे पैसे भरून रीतसर परवानगी मिळविली होती. त्यानंतर वेळोवेळी कराराचे नूतनीकरण करून जिमखान्यासाठी या पदपथाचा वाहनतळ म्हणून वापर होत होता. काही महिन्यांपूर्वी कराराची मुदत संपुष्टात आल्याने जिमखान्याने नूतनीकरणाकरिता प्रयत्न चालविले होते.

आजही जिमखान्याकडून या पदपथावर सर्रास वाहने उभी केली जात असून त्याकडे वाहतूक पोलीसही कानाडोळा करीत आहेत.

सोमाणी मार्गाच्या विस्तारातही अडथळा

महात्मा गांधी मार्गावरून सीएसटीला जाणाऱ्या हजारीमल सोमाणी मार्गाचा विस्तार करण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे नरिमन पॉइंट येथून जे. जे. उड्डाणपुलाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या कोंडीचा प्रश्न सुटेल. मात्र याकरिता जिमखान्याची जागा आवश्यक असून त्याला जिमखान्याचा विरोध आहे. म्हणून सध्या तरी निम्म्या मार्गाच्या विस्ताराचे काम कंत्राटदाराला देण्यात आले आहे. वाहनतळाबाबत निर्णय घेण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी घ्यावी, असे पत्र पालिकेला पाठविण्यात आल्याने हा वाद आणखी गुंतागुंतीचा झाला आहे.