फेरीवाल्यांना एम. जे. रोडऐवजी भाटियाबाग उद्यानासमोर जागा देणार

बॉम्बे जिमखान्याच्या दबावामुळे अखेर महापालिकेने नांगी टाकत छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील परवानाधारक बाकडे (पिच) असलेल्या फेरीवाल्यांना वालचंद हिराचंद रोड आणि डी. एन. रोड जंक्शनच्या समोरील पदपथावर हलविण्याचा निर्णय घेतला आहे. या परिसरातील स्टॉलबाबत प्रशासनाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत देशातील दहा ठिकाणांचा परिसर स्वच्छ आणि देखणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या दहा ठिकाणांमध्ये समावेश असलेल्या सीएसटी परिसराचा क्रमांक आघाडीवर यावा म्हणून पालिकेने धावपळ करीत एक आराखडा तयार केला आणि तो केंद्राला सादर केला. परंतु हा परिसर सुशोभित करण्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. या परिसरातील बाकडेधारक आणि स्टॉलवाल्या फेरीवाल्यांना स्थलांतरित करणे, पदपथांची दुरुस्ती करणे, परिसरातील इमारतींनुसार पदपथ, पूल आदींची रंगसंगती करणे आदी कामे करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

परिसरातील फेरीवाल्यांना महात्मा गांधी रोडवर हलविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता, मात्र बॉम्बे जिमखान्याकडून दबाव आल्यामुळे आता पालिकेने एक पाऊल मागे घेतले आहे. टर्मिनस परिसरातील पालिकेने परवाना दिलेल्या ३८ बाकडेधारक फेरीवाल्यांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. महात्मा गांधी रोडऐवजी टर्मिनस परिसरातील भाटियाबाग उद्यानाच्या समोरील हॉटेल शिवालाजवळील पदपथावर या फेरीवाल्यांची रवानगी करण्यात येणार आहे. त्यामुळे टर्मिनस परिसराची या फेरीवाल्यांच्या कलकलाटातून मुक्तता होणे अवघड आहे. बाकडेधारक फेरीवाल्यांवर लवकरच नोटीस बजावण्यात येणार असून नोटीसची मुदत संपुष्टात आल्यानंतर त्यांना सध्याच्या जागेवरून हलविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर टर्मिनस परिसरात २९ स्टॉल्स असून ते सुशोभीकरणात बाधा ठरत आहेत. हे स्टॉलही स्थलांतरित करण्याच्या विचारात पालिका आहे. तेही बॉम्बे जिमखान्यालगतच महात्मा गांधी रोडवर हलविण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. मात्र तूर्तास या स्टॉलच्या स्थलांतराबाबतचा प्रश्न गुलदस्त्यातच आहे. बॉम्बे जिमखान्याकडून येणाऱ्या वाढत्या दबावामुळे स्टॉल्सचे स्थलांतर कुठे करायचे, असा प्रश्न प्रशासनापुढे पडला आहे.