निकाल काय लागेल, किती शिक्षा होईल, फाशी तर होणार नाही या विचाराने मुंबई बॉम्बस्फोट मालिका खटल्यातील प्रमुख आरोपी मुस्तफा डोसा, अबू सालेम यांचे धाबे दणाणले आहेत. ‘लोकसत्ता’ला मिळालेल्या माहितीनुसार डोसाने अन्य कैदी, साथीदारांमध्ये मिसळणे त्याने बंद केले आहे. त्याउलट डोसासोबत बंद असलेले बॉम्बस्फोट मालिकेतील अन्य तीन आरोपी मात्र तणावमुक्त असून आम्ही सुटणार या आत्मविश्वासात आहेत. सालेम तळोजा कारागृहात बंद असून तोही प्रचंड तणावात असल्याची माहिती मिळाली आहे.

डोसाने दुबईत बसून पाकिस्तानच्या मदतीने भारतात आरडीएक्स या स्फोटकासह मोठय़ा प्रमाणात शस्त्रे, दारूगोळा धाडला. रायगडच्या दिघी, शेखाडीसह गुजरातच्या भरूच किनाऱ्यावर डोसाचा मोठा भाऊ मोहम्मद व साथीदारांनी तो उतरवून घेतला. याच स्फोटकांच्या जोरावर मुंबईत भीषण बॉम्बस्फोट मालिका घडवणे दहशतवाद्यांना शक्य झाले, असा आरोप केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ठेवला आहे. तो सिद्ध करण्यासाठी भक्कम पुराव्यांची मालिका न्यायालयासमोर आणल्याचा दावा सीबीआयकडून केला जातो. शुक्रवारी खटल्याच्या दुसऱ्या टप्प्यात डोसासह सात आरोपींचा फैसला विशेष टाडा न्यायालय करेल. या सात आरोपींमध्ये डोसा हा प्रमुख आरोपी असून त्याचा या गुन्ह्य़ातील सहभाग मोठा आहे. त्यामुळे न्यायालयाने दोषी ठरवल्यास सीबीआय याकूब मेमनप्रमाणे डोसासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी करू शकते. बहुधा हा अंदाज लागल्याने सर्व कैद्यांमध्ये मिळून मिसळून राहणारा डोसा तणावग्रस्त बनला आहे. कारागृहातील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या दोन दिवसांपासून कोणाशीही बोलत नाही. त्याला वाचता येत नाही. त्यामुळे कारागृहात आल्यापासून कैद्यांसोबत गप्पा मारणे आणि देवाचा जप करणे हाच त्याचा कारागृहातील विरंगुळा होय. पण गेल्या दोन दिवसांपासून तो खूप तणावात आहे.

डोसासोबत तीन वेळा बाचाबाची घडल्याने तसेच डोसा व साथीदारांनी चेहेऱ्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याने गुंड सालेमला आर्थररोड कारागृहातून तळोजा कारागृहात हलविण्यात आले. तेथे त्याच्यावर गोळीबारही झाला होता. देवेंद्र जगताप ऊर्फ जेडीने सालेमवर अत्यंत जवळून गोळ्या झाडल्या होत्या. अत्यंत घाबराघुबरा स्वभाव असलेल्या सालेमचीही निकालाच्या भीतीने गाळण उडाल्याची माहिती तळोजा कारागृहातून मिळते.