गर्भात दोष असल्याने न्यायालयाचा निर्णय

गर्भात दोष असल्याने नाशिक येथील महिलेला ३०व्या आठवडय़ात गर्भपात करण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली. जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांनी गर्भपात करण्याबाबत अहवाल दिल्यानंतर न्यायालयाने तिची विनंती मान्य केली.

या महिलेला पाच वर्षांचा मुलगा असून तो गतिमंद आहे. या गर्भातही दोष आढळल्याने तिने आणि तिच्या पतीने गर्भपाताची परवानगी मागितली होती. या महिलेची नाशिक येथील खासगी रुग्णालयात गर्भपात करू देण्याची विनंतीही न्यायालयाने मान्य केली.

खासगी रुग्णालयात गर्भपात करण्याच्या तिच्या मागणीला सरकारी वकीलांनी तीव्र विरोध केला. वैद्यकीय कारणास्तव केल्या जाणारा गर्भपात कायद्यानुसार सरकारी रुग्णालयात करणे बंधनकारक आहे. त्यामुळे या महिलेचा गर्भपातही मुंबईतील सरकारी रुग्णालयात करणे आवश्यक आहे, असे सरकारचे म्हणणे होते. गर्भपाताची परवानगी असलेली रुग्णालये स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणीकृत असावीत अशी अट आहे.

‘तुमच्या दिरंगाईची शिक्षा महिलेला नको’

याचिकाकर्ती महिला नाशिक येथील ज्या खासगी रुग्णालयात गर्भपात करू देण्याची मागणी करत आहे, ते रुग्णालयही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंदणीकृत असले तरी अशा रुग्णालयांमध्ये २० आठवडय़ांपुढील गर्भपातास परवानगी देण्याची कायदेशीर प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही, असेही सरकारच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले. सरकारने ही प्रक्रिया पूर्ण केली नाही, याची शिक्षा या महिलेला दिली जाऊ शकत नाही, असे नमूद करत न्यायालयाने, खासगी रुग्णालयात गर्भपात करण्याची तिची मागणी मान्य केली.