पोलिसांची घरे आहेत म्हणून यापुढे कंत्राटदारांना ती कशीही बांधून चालणार नाहीत. महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण मंडळाने नव्याने तयार केलेल्या नियमावलीनुसारच कंत्राटदारांना घरांची निर्मिती करून आवश्यक त्या ब्रँडेड कंपनीच्याच सुविधा पुरवाव्या लागणार आहेत. या सुविधा पुरविल्या आहेत किंवा नाही, या बाबत तपासणी झाल्यानंतरच कंत्राटदारांची देयके अदा केली जाणार आहेत. पोलिसांच्या इमारतींचा दर्जा टिकाऊ असावा, यासाठी विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली असून, त्यानुसारच घरे बांधावी लागणार आहेत. त्यासाठी २५ नामांकित वास्तुरचनाकारांची नव्याने निवड करण्यात आली आहे.
राज्यात तब्बल साडेपाच हजार हेक्टर भूखंडांचे मालक असलेल्या पोलिसांसाठी घरे बांधताना आतापर्यंत कुठल्याही प्रकारची काळजी घेतली गेली नसल्यामुळे अल्पावधीतच या इमारती निवासीयोग्य नसल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलीस गृहनिर्माण मंडळाचे महासंचालक अरुप पटनाईक यांनी सांगितले. निविदा कागदपत्रांमध्ये विविध प्रकारच्या सुविधांसाठी कुठल्या कंपन्या हव्यात याची संपूर्ण यादी जोडली जात असे. परंतु प्रत्यक्षात त्यानुसार काम होते किंवा नाही, याची तपासणी होत नव्हती. त्यामुळे आतापर्यंत जी कामे झाली त्यात कंत्राटदारांनी दुय्यम दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्याचेही स्पष्ट झाल्याचे पटनाईक यांनी सांगितले. आता कंपन्यांच्या सामग्रीची छायाचित्रे दाखविणारी एक पुस्तिकाच मंडळाने तयार केली आहे. त्यानुसारच आता कंत्राटदारांना कामे करावी लागणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
पोलिसांच्या गृहप्रकल्पासाठी मंडळात तब्बल २०० वास्तुरचनाकार काम करीत होते. या वास्तुरचनाकारांना मनमानी शुल्क अदा करण्यात आल्याची गंभीर बाबही उघड झाली. कंत्राटदारांची निवड करण्यासाठी आवश्यक असलेल्या निविदांतील अटी-शर्तीबाबतही कुठलीही नियमावली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करीत होते. आता मात्र स्वतंत्र नियमावली तयार करून पोलिसांच्या भविष्यातील इमारती कशा असाव्यात ते पोलिसांच्या घरात कुठल्या सुविधा असाव्यात, याबाबत नियमावली तयार करून त्यानुसारच कंत्राटदारांना सुविधा पुरवाव्या लागणार आहेत, असेही पटनाईक यांनी स्पष्ट केले.
सिमेंट, रेडीमिक्स, विटा, रेती कुठून घ्यावी ते इलेक्ट्रिकल फिटिंग्ज, लिफ्ट आदी कुठल्या कंपन्यांच्या असाव्यात, याबाबतही या नियमावलीत उल्लेख आहे. राज्यात ज्या ठिकाणी बांधकाम सुरू असेल त्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली असून, मंडळाचे महासंचालक मोबाइलवरून त्यावर नियंत्रण ठेवू शकणार आहेत. त्यामुळे काम सुरू आहे का वा नियमावलीनुसार ते आहे का, यावरही आपली नजर असेल, असा दावा पटनाईक यांनी केला.
निशांत सरवणकर, मुंबई

पोलिसांच्या नव्या घरात आवश्यक सुविधा
सॅनिटरी फिटिंग्ज – जग्वार, जॉन्सन.
अल्युमिनिअम -जिंदाल, हिंदाल्को.
सिरॅमिक टाइल्स – जॉन्सन, कजारिया, निटको.
जीआय पाइप – सूर्या, जिंदाल.
वॉल्व्ह, पंप – किलरेस्कर, बजाज.
(याबाबत पोलीस गृहनिर्माण मंडळाने छायाचित्रांसह पुस्तिका तयार केली आहे.)