24 November 2017

News Flash

मोदींना हुलकावणी, चव्हाणांना टाळी!

‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा वाजवीत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद न देता ब्रिटनचे पंतप्रधान

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: February 19, 2013 5:38 AM

‘व्हायब्रंट गुजरात’चा नारा वाजवीत नरेंद्र मोदी यांनी केलेल्या प्रयत्नांना दाद न देता ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राकडे पावले टाकली. गुजरातचा गाजावाजा करण्याची मोदींची धडपड कॅमेरून यांच्या मुंबई भेटीमुळे निष्फळ ठरली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय कौशल्य वापरून कॅमेरून यांना मुंबईत आणले.
पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरलेल्या नरेंद्र मोदींकडून ब्रिटनच्या पंतप्रधानांना गुजरातमध्ये आणण्यासाठी पडद्याआडून बऱ्याच हालचाली सुरू होत्या. ब्रिटनमध्ये गुजराती व्यावसायिकांची संख्या बरीच आहे. त्यांच्या मार्फत लॉबीईंग सुरू होते. याशिवाय देशातील बडय़ा उद्योजकांकडूनही मदत घेतली जात होती.
कॅमेरून यांनी गुजरातला भेट दिली असती तर मोदींना फायदा झाला असता. गुजरातमधील दंगलीचा कलंक पुसण्यासाठी मोदी यांना बडय़ा असामीची गरज होती. या अंतस्थ हेतूनेच मोदी यांनी युरोपीय युनियनच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. दिल्लीत त्यांनी जर्मनीच्या राजदूतांबरोबर भोजनही घेतले. मोदींबाबत युरोपीय युनियनचे धोरण थोडे मवाळ झाल्याचे त्यानंतरच्या वक्तव्यावरून दिसत होते.
गुजरातच्या दंगलीवरून युरोपमध्ये मोदींच्या विरोधात वातावरण आहे. मानवी हक्कांसाठी अतिशय जागरूक असणाऱ्या युरोपमध्ये मोदींना फारशी मान्यता नाही. अमेरिकेने त्यांना व्हिसा पूर्वीच नाकारला आहे. पंतप्रधान पदासाठी मोर्चेबांधणी करताना युरोप व अमेरिका या जगातील दोन मोठय़ा आर्थिक शक्तींचा विरोध मोदींना डावलता येत नाही. म्हणूनच गुजरातमधील विजयानंतर मोदींनी युरोपीय युनियनचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला.
या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरून यांना गुजरातमध्ये पाचारण करण्यात येणार होते. मोदींची प्रतिमा उजळण्यास त्यामुळे मदत झाली असती. परंतु, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्लीतील आपला अनुभव पणाला लावला. मुख्यमंत्री चव्हाण यांच्या प्रयत्नानंतर कॅमेरून यांनी गुजरातऐवजी महाराष्ट्र पसंत केला.
महाराष्ट्राला अनुकूल प्रतिसाद
कॅमेरुन आणि चव्हाण यांच्यात सोमवारी ताजमहाल हॉटेलमध्ये चर्चा झाली. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाटी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कॅमेरून यांच्याबरोबरचे शिष्टमंडळ त्यावेळी उपस्थित होते. मुंबई मेट्रो विस्तार, महाराष्ट्रातील अन्य शहरांमधील पायाभूत सुविधांचा विकास, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, नवी मुंबई विमानतळ, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आदी विषयावर यावेळी चर्चा झाली. मुंबई व महाराष्ट्रात गुंतवणुकीची इच्छा या शिष्टमंडळाने व्यक्त केल्याचे समजते.

First Published on February 19, 2013 5:38 am

Web Title: british media meet chavan ignor narendra modi
टॅग British Media