विरारमधील कोपरी नित्यानंद नगर भागात असलेल्या एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची घटना काही वेळापूर्वीच घडली आहे. या ठिकाणी २५ ते ३० वर्षे जुन्या चार मजली इमारती आहेत. त्यापैकी एका इमारतीचा भाग कोसळला. या घटनेत चार वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. इमारतीत अनेक लोक अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु आहे. अग्निशमन दल, विरार पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी बचाव कार्य सुरु केलं आहे.

इमारती कोसळण्याचे प्रकार मुंबईतही घडले आहेत. काही दिवसांपूर्वीच ड़ोंगरी या ठिकाणी असलेली इमारत कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला होता. जुलै महिन्यात ही घटना घडली होती. तर पुण्यातही इमारतीची संरक्षक भिंत कोसळून १० पे७ा जास्त लोकांचा जीव गेला होता. आता मुंबईतील विरार भागात अशीच दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

मंगळवारी रात्री ८ च्या सुमारास अचानाक इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला. यामुळे एकच खळबळ उडाली. इमारतीत राहणारे नागरिक सैरावैरा धावत सुटले. अग्निशमन दलाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. इमारतीत ३५ ते ४० लोक अडकले होते. त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र या दुर्घटनेत इमारतीत राहणाऱ्या चार वर्षीय चिमुरडीचा ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची माहिती अग्निशमन विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली.