News Flash

‘बेस्ट’चा संप सुरूच

चर्चेतून तोडगा नाही; मुंबईकरांचे अतोनात हाल

चर्चेतून तोडगा नाही; मुंबईकरांचे अतोनात हाल

पालिका, बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान कोणताही तोडगा निघू न शकल्यामुळे सहाव्या दिवशीही बेस्ट कामगारांचा संप सुरूच असून त्यामुळे मुंबईकरांचे मात्र अतोनात हाल होऊ लागले आहेत. मुंबईकरांना रेल्वे प्रवासानंतर कार्यालयात जाण्या-येण्यासाठी पायपीट करीत किंवा टॅक्सीने प्रवास करावा लागत आहे.

कामगारांचा वेतन करार, कनिष्ठ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा, बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करणे आदी विविध मागण्यांसाठी गेल्या सोमवारी मध्यरात्रीपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. बेस्टचे जवळपास ३० हजार कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.

पालिका आणि बेस्ट प्रशासन तसेच शिवसेनेच्या पातळीवर चर्चा झाल्यानंतरही या संपावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. संप मिटवण्यासाठी रविवारी रात्रीपर्यंत संपकरी आणि प्रशासनात बोलणी झाली नाहीत. त्यामुळे सोमवारीही संप सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले असून सोमवारी याप्रकरणी सुनावणी होत आहे.

राज्य सरकारने याप्रश्नी उच्चस्तरीय त्रिसदस्यीय समिती नेमून त्याआधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र, उच्चस्तरीय समिती आणि कृती समितीमध्ये झालेल्या बैठकीतून काहीही निष्पन्न झाले नाही. संपाबाबत न्यायालय कोणते आदेश देते याकडे कामगार संघटनांसह सर्वाचेच लक्ष लागले आहे.

रविवार असल्यामुळे अनेक मुंबईकर घराबाहेर पडले होते. मात्र बेस्ट संपामुळे या सर्वाना टॅक्सी-रिक्षाचा पर्याय निवडावा लागला. तर अनेकांनी घरातच बसणे पसंत केले. बेस्ट बस बंद असल्यामुळे शाळकरी मुलांचेही हाल होत आहेत. परळ परिसरातील ‘लक्ष्मी कॉटेज’मधील मुलांनी ‘बेस्ट बचाव’चे बॅनर हाती घेऊन रस्त्यावर धाव घेतली. नित्यनियमाने वेळेत शाळेत पोहोचविणारी बेस्ट वाचविण्यासाठी  लवकर तोडगा काढावा, असे आवाहन या मुलांनी बॅनरच्या माध्यमातून केले.

बेस्ट प्रशासनाने मेस्मासह कर्मचारी वसाहतीतील घरे रिकामी करण्याची नोटीस दिल्यानंतरही कर्मचाऱ्यांनी माघारीचे पाऊल घेतलेले नाही. दरम्यान आता ओला-उबेर चालकांनीही संपाचा इशारा दिल्यामुळे मुंबईकर धास्तावले आहेत.

ठाणे, नवी मुंबईतील प्रवाशांनाही मनस्ताप 

या संपामुळे सध्या शहरासह मीरारोड, भाईंदर, ठाणे, नवी मुंबईपर्यंतची बससेवा ठप्प झाली आहे. बेस्टच्या रोजच्या २५ ते ३० लाख प्रवाशांना या संपामुळे मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून चालक, वाहकांनी आगाराकडे येणे बंद केले आहे.  रविवारी दिवसभरात केवळ चार चालक आगारात आले होते. पण एकही बस रस्त्यावर येऊ शकली नाही. गेल्या काही वर्षांतील प्रदीर्घ कालावधीसाठी चाललेला हा संप आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2019 12:48 am

Web Title: bus employees on strike in mumbai 3
Next Stories
1 ‘बेस्ट’ संपाबाबत चर्चेतून मार्ग काढूया: उद्धव ठाकरे
2 लोकलच्या दरवाजांवर निळे दिवे
3 राष्ट्रवादीने प्रतिमा जपली!
Just Now!
X