बोरिवलीत पाच लक्झरी बसेस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यानं जळून खाक झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला होता. मात्र, या घटनेला नवीन वळण मिळालं आहे. पगार न मिळाल्याने एका ड्रायव्हरचं टाळकं सटकल्याने त्याने एकापाठोपाठ पाच लक्झरी बसेस जाळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तपासात ड्रायव्हरनेच ही आग लावल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

बोरिवलीत पाच लक्झरी बसेसला आग लागली होती. या आगीत या पाचही लक्झरी बसेस जळून खाक झाल्या होत्या. सुरुवातीच्या चौकशीत ही आग शॉर्ट सर्किटने लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हाही दाखल केला होता. पोलीस चौकशीतही ही आग शॉर्टसर्क्रिटने लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.

मात्र, पोलिसांनी अधिक तपास केला. त्यावेळी पोलिसांनी बसचा चालक अजय रामपाल सारस्वतला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यानंतर त्याला पोलिसी खाक्या दाखवला. या चौकशीत त्यानेच बसेस पेटवून दिल्याची कबुली दिली. पगार न मिळाल्याने पाच बसेसला आग लावल्याची कबुली या ड्रायव्हरने दिली. अजय सारस्वतने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या पाचही बसेसची किंमत सुमारे ३ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. या पाचही बसेसचा विमा उतरविण्यात आलेला नसल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट येले यांनी सांगितलं.