राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेच्या रिक्त असलेल्या १२ सदस्यांच्या नियुक्तीसाठी शिफारस करण्याचा प्रस्ताव बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मात्र राज्यपालांना पाठविण्यात येणाऱ्या यादीत नेमकी नावे कोणाची आहेत, याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.

विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ जागा एप्रिल ते जून या दरम्यान मुदत संपल्याने रिक्त झाल्या होत्या. राज्य सरकारकडून त्या जागांवर नियुक्त्यांसाठी काही नावे पाठविण्यात आली होती; परंतु संविधानातील तरतुदीकडे बोट दाखवत राज्यपालांनी विधान परिषदेवर राजकीय नियुक्त्या करण्यास नकार दिला.

राज्यपाल नामनिर्देशित सदस्य हे साहित्य, कला, विज्ञान, सहकार, सामाजिक कार्य या क्षेत्रांतील विशेष ज्ञान व अनुभव संपन्न असावेत अशी संविधानात तरतूद आहे. त्याचा आधार घेत, राज्यपालांनी राज्य सरकारला नव्याने नावांची शिफारस करण्याचे कळविले. राज्यपालांची सूचना सरकारला मान्य करावी लागली.

शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये  विधान परिषदेच्या १२ जागांचे समान वाटप करण्यात आले. तीनही पक्षांत विशेषत: काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची गर्दी होती. त्यातून दोन्ही पक्षांनी प्रत्येकी चार नावे निश्चित केल्याचे समजते. शिवसेनेचीही चार नावे निश्चित झाल्याचे कळते.

गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत विधान परिषदेवर १२ सदस्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. लवकरच नावांची यादी राज्यपालांना पाठविण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.