लाल दिव्याची गाडी, बंगला व सर्व सुविधा

भाजप-शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला जाणार असून, लाल दिव्याची गाडी, बंगला व अन्य सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. विधानसभा व विधान परिषदेतील प्रत्येकी दोन अशा चार जणांना राज्य मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद व प्रतोदांना दिले जाणारे लाभ हे ‘लाभार्थी पद’मधून वगळावेत, अशी दुरुस्ती सुचविणारे विधेयक विधानसभेत बुधवारी मंजूर करण्यात आले. विधान परिषद व अन्य मंजुरी घेतल्यानंतर राज पुरोहित, सुनील प्रभू, भाई गिरकर व डॉ. नीलम गोऱ्हे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

राज्यात सरकारने प्रथमच अशाप्रकारे पाऊल उचलले असून मध्य प्रदेश व अन्य काही राज्यांच्या धर्तीवर हे होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या निमित्ताने चार नवीन राज्यमंत्र्यांचीच नियुक्ती होणार असून हा छोटेखानी मंत्रिमंडळ विस्तार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या ४३ असावी, असे बंधन आहे. सध्या ३९ मंत्री असून चार जागा रिक्त जागा आहेत. सध्या या चार जणांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळणार आहे. त्यांची गणना मंत्रिमंडळाच्या संख्येत होणार नाही व आणखी नवीन नेत्यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे. मध्य प्रदेश व अन्य काही राज्यांच्या धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य प्रतोद व प्रतोद यांना सुविधा दिल्या गेल्यावर त्यांचे पद हे ‘लाभार्थी पद’ गृहीत धरू नये, अशी तरतूद करण्यात आली आहे. सत्ताधारी पक्षाच्याच प्रतोदांसाठी ही तरतूद असून भाजप व शिवसेनेचे दोन्ही सभागृहात १४ प्रतोद आहेत. पण त्यापैकी सध्या मुख्य प्रतोदांनाच राज्यमंत्र्यांचा दर्जा दिला जाईल, भविष्यात अन्य प्रतोदांचाही विचार होऊ शकतो, म्हणून तरतूद करून ठेवली आहे, असे सूत्रांनी सांगितले.