१६८ रुग्णांची तातडीने व्यवस्था

मुंबई : प्राणवायूअभावी रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे लक्षात येताच क्षणाचाही विलंब न लावता मुंबई महापालिकेच्या वॉर्डबॉयपासून ते डॉक्टरांपर्यंत प्रत्येक कर्मचाऱ्याने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने एकेका रुग्णालयातून रुग्णांना प्राणवायूची व्यवस्था असलेल्या रुग्णालयात हलविण्यास सुरुवात केली. रात्री नऊ ते पहाटे साडेचापर्यंत  तब्बल १६८ रुग्णांना पालिकेच्या रुग्णालयांत सुखरूप पोहोचवले.

या मोहिमेत आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, अधिष्ठाते , डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉयपर्यंत सर्वांच्या हालचाली जणुकाही लष्कराच्या एखाद्या गतिमान कारवाईसारख्या झाल्या..दरम्यान राज्यातील वैद्यकीय प्राणवायूची चणचण लक्षात घेऊन पालिकेने रोज ५० मेट्रिक टन प्राणवायू उपलब्ध होईल यासाठी एका कंपनीबरोबर करारही केला. यामुळे पालिकेला आता दररोज २८५ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा होणार असल्याने मुंबईत तरी वैद्यकीय प्राणवायूची चणचण निर्माण होणार नाही.

महापालिका अतिरिक्त आयुक्त ( आरोग्य) सुरेश काकाणी हे दररोज दुपारी पालिका रुग्णालयांतील रुग्ण, औषधसाठा, उपकरणे, ऑक्सिजन तसेच रेमडेसिवीरची परिस्थिती आदींचा आढावा घेतात. असाच आढावा घेत असताना पालिकेच्या काही रुग्णालयात पालिकेला पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांकडून प्राणवायू पोहोचला नसल्याचे कळले. पालिका रुग्णालयांना आयनॉक्स व लिंडा या दोन पुरवठादारांकडून  रोज २३५ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा  केला जातो. सायंकाळी पुन्हा एकदा प्राणवायूचा पुरवठय़ाचा आढावा घेतला असता लिंडा कडून पुरेसा साठा आला नसल्याचे लक्षात येताच काकाणी यांनी संबंधित पुरवठादारांना दूरध्वनी करून विचारणा केली. आमचे टँकर निघाले आहेत, ते रस्त्यात आहेत असे उत्तर मिळताच अतिरिक्त आयुक्तांनी टँकरचे लोकेशन तपासले तेव्हा वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकत नाही हे लक्षात आले. त्याबरोबर ज्या रुग्णालयांना या टँकरने पुरवठा होणार होता तेथील डॉक्टरांशी त्यांनी तात्काळ संपर्क साधला व ऑक्सिजन तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांची माहिती घेतली.. रात्री उशिरापर्यंत प्राणवायू  टँकर पोहोचले नाहीत तर रुग्णांचे प्राण कंठाशी येऊ शकतात हे लक्षात घेऊन लगेचच आयुक्त इक्बालसिंग चहल यांना परिस्थितीची कल्पना दिली. लागोलाग वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, बोरिवलीतील भगवती रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालय, मुलुंडचे एम.टी. अग्रवाल व जोगेश्वरी येथील ट्रॉमा  सेंटरमधील १६८ रुग्णांना अन्यत्र हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी युद्धपातळीवर पालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त तसेच अधिष्ठाता व संबंधित रुग्णालयांच्या प्रमुखांची ऑनलाईन बैठक घेण्यात आली.

याबाबत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना विचारले असता ते म्हणाले, ती वेळच अशी होती की तात्काळ निर्णय घेणे गरजेचे होते. ऑक्सिजन खाटेवर असलेल्या तसेच अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णांना योग्य ठिकाणी व सुरक्षितपणे हलवणे एक आव्हान होते. यासाठी किती रुग्णवाहिका लागतील तसेच कोणत्या रुग्णांना कोणत्या प्रकारची रुग्णवाहिका लागेल, त्यांची उपलब्धता याचा आढावा घेतला. कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध होतील ते तपासले. त्यानुसार पथके तयार करून एकेका रुग्णालयातून रात्री नऊ वाजल्यापासून रुग्ण हलविण्यास सुरुवात केली. पहाटेपर्यंत १६८ रुग्णांना सुरक्षितपणे पालिकेच्या अन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे जसे खरे आहे तसेच दैव बलवत्तर होते कारण रात्री कोठेही रुग्णांना बसवताना वाहतुकीचा सामना करावा लागला नाही. कालची घटना ही  एक युद्धजन्य परिस्थिती होती असे सांगून अतिरिक्त आयुक्त म्हणाले,    पालिकेने काही दिवसांपूर्वी मुंबईतील डॉक्टरांची बैठक घेतली होती.