कर्करोगाने ग्रस्त असलेल्या एका चार वर्षांच्या मुलीचा लोकलमधील धक्काबुक्कीमुळे बळी गेला आहे. परळच्या केईएम रुग्णालयात आईसोबत उपचारांसाठी जात असताना नेहा ठगे ही चिमुरडी प्रचंड गर्दीच्या रेटय़ामुळे उपनगरी गाडीतून खाली पडली.  केमोथेरपीच्या उपचारांना सामोरे गेलेल्या नेहाचा  लोकलच्या गर्दीने मात्र बळी घेतला.

विदर्भातील वाशीम जिल्ह्य़ातून नेहाला तिच्या आईवडिलांनी उपचारांसाठी मुंबईत आणले होते. लवकरच ती आपल्या मूळ गावी परतरणार होती.

विदर्भातील वाशीम जिल्ह्य़ात राहणारी नेहा ठगे हिच्या पोटात खूप दुखत होते. मात्र वाशीममधील डॉक्टरांना तिच्या आजाराचे निदान करता आले नाही. त्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला काही महिन्यांपूर्वी मुंबईत उपचारांसाठी आणले होते. नेहाला कर्करोग झाला असल्याचे निदान केईएम रुग्णालयातील डॉक्टरांनी केले होते.

नेहाचे वडील मजुरीचे काम करत असल्याने त्यांचे उत्पन्न बेताचेच आहे. उपचारांसाठी आल्यावर राहण्याची सोय नसल्याने सुरुवातीचे काही दिवस त्यांनी पदपथावरच काढले. त्यानंतर एका सामाजिक संस्थेने त्यांची चेंबूर येथे राहायची सोय केली. मात्र केईएम ते चेंबुर मोनोने प्रवास करणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे लोकलने प्रवास करावा लागत होता. काही दिवस त्यांनी मोनोने प्रवासही केला, मात्र पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी नेहाच्या वडिलांना गावी जावे लागले.

नेहाचे वडील गावी गेल्यावर लोकलने प्रवास करून नेहाला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्याची वेळ आईवर आली.

नेहाला केईएम रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तिची आई चेंबूर स्थानकात सकाळी ८.३० वाजता आली. गर्दीने भरलेल्या दोन गाडय़ांमध्ये चढणे शक्य नसल्याने त्यांनी त्या गाडय़ा सोडल्या. मात्र रुग्णालयात जायला उशीर होत असल्याने गर्दीतून गाडीसाठी वाट काढताना नेहाच्या कर्करोगाच्या गाठीला इजा झाली. लोकल सुरू झाल्याने आईसह ती खाली फलाटावर पडली. त्यामुळे तिच्या तोंडातून, कानातून आणि डोळ्यातून रक्तस्राव सुरू झाला.

स्थानकावरील रेल्वे गार्डने तात्काळ घटनास्थळी येऊन नेहाला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. तेथून तिला उपचारांसाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

कुटुंब व्यथित मनाने परतले 

मागील काही दिवसांच्या उपचारांतून नेहाच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. त्यातून ती बरी होऊन घरी जाऊ शकेल अशी आशा निर्माण झाली असतानाच तिचा असा मृत्यू झाला. नेहाला दोन भावंडे असून त्यापैकी एक सहा वर्षांचे तर दुसरे एक वर्षांचे आहे. ८ सप्टेंबरला वडील पैसे आणण्यासाठी गावी गेले आणि त्यानंतर ९ सप्टेंबरला ही घटना घडली. १० सप्टेंबरला हे कुटुंब कडवट मनाने गावाकडे परतले.