मुंबईत गाडी चोरी केल्याप्रकरणी अटक झालेल्या तरुणाने उत्तर प्रदेशातील दरोडय़ाचीही कबुली दिली आहे. या आरोपीची सध्या चौकशी सुरू असून त्याच्याकडून चोरीच्या गाडय़ांची आणखी माहिती मिळण्याची शक्यता आहे.
मोटर वाहन चोरीविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक आनंद मुदलियार यांना या गाडी चोराची माहिती मिळाली होती. सदर इसम धारावी परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून मुदलियार यांच्या नेतृत्त्वाखाली संजीव गावडे, अनिल गंगावणे, सदानंद कोकितकर आदींनी सापळा रचून सँथ्रो गाडीतून आलेल्या मोहम्मद इस्माईल मोहम्मद जिब्राईल कुरेशी या तरुणाला अटक केली. अधिक चौकशीत ही गाडीची चोरीची असल्याचे आढळून आले.
अधिक चौकशीत इलाहाबाद येथे दरोडा आणि दोन इसमांच्या हत्येप्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे उघडीस आले. या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी संपर्क साधून खातरजमा करण्यात आली. गाडय़ा चोरीप्रकरणी त्याचा अधिक सहभाग आहे का, याची चौकशी सुरू आहे.