पंजाब नॅशनल बँकेच्या ११ हजार ४०० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. बेचु तिवारी, यशवंत जोशी आणि प्रफुल्ल सावंत अशी या तिघांची नावे आहेत. सीबीआयने ही कारवाई केली आहे. पंजाब नॅशनल बँकेला हिरे व्यापारी नीरव मोदी त्याचा नातेवाईक मेहुल चोक्सी या दोघांनी ११ हजार ३०० कोटींचा चुना लावला. या घोटाळ्यात बँकेच्या अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे उघड झाले आहे.

सीबीआयने या घोटाळ्याप्रकरणी गोकुळनाथ शेट्टी, हेमंत भट्ट आणि मनोज खरात या तिघांना रविवारीच अटक केली त्यानंतर आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये पीएनबी घोटाळा २०१७-१८ च्या दरम्यान घडल्याचे म्हटले आहे.

पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार ३०० कोटींचा चुना लावणाऱ्या नीरव मोदीला लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून देण्यात गोकुळनाथ शेट्टीचा मोठा हात होता. आता सोमवारी अटक करण्यात आलेल्या तिघांचे या घोटाळ्याशी नेमके काय कनेक्शन आहे याचा तपास केला जातो आहे. ११ हजार ३०० कोटींचा घोटाळा झाल्यानंतर अटकेची ही दुसरी कारवाई आहे. आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणात बँकेच्या ६ अधिकाऱ्यांना अटक केल्याचे स्पष्ट झाले आहे. आज सकाळीच या शाखेला टाळे ठोकण्यात आले होते. याच शाखेतून नीरव मोदीने घोटाळा केल्याचे समजते आहे.

भारतात हजारो कोटींचे घोटाळे झाले असले तरी बँकिंग क्षेत्रातला सगळ्यात मोठा घोटाळा असे वर्णन पीएनबी घोटाळ्याचे करण्यात येत आहे. बँकेतल्या आजी माजी व वेगवेगळ्या स्तरावरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे जगभरातील भारतीय बँकांच्या शाखांमधून एकूण ११ हजार ३०० कोटी रुपये लंपास करण्यात आल्याचा आरोप आहे.