नव्वद टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत २० हजारांनी वाढ

मुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रमाणात काकणभर वाढ दिसत असली, तरी गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येत यंदा घसघशीत वाढ झाली आहे. देशपातळीवरील निकालाची टक्केवारी ८३.४० टक्के तर महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९२.९३ टक्के लागला आहे.

देशात उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलची हंसिका शुक्ला आणि मुझफ्फरनगरच्या एस. डी. पब्लिक स्कूलच्या करिश्मा अरोरा यांनी ४९९ गुणांसह देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सीबीएसई बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यंदा गौरांगी चावला, ऐश्वर्या आणि भाव्या या तीन विद्यार्थिनींनी ४९८ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. यंदा निकालातील चुरस अधिक वाढली आहे. ४९७ ते ४९९ पर्यंत गुण मिळवणारे म्हणजेच पहिल्या तीन क्रमांकावर स्थान मिळवणारे २३ विद्यार्थी आहेत. मात्र, त्यामध्ये महाराष्ट्रातील एकही विद्यार्थी नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ९५ आणि ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे.

अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत मात्र यंदा मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. यंदा १७ हजार ६९३ विद्यार्थ्यांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले असून गेल्या वर्षीपेक्षा ४ हजार ९५६ विद्यार्थी अधिक आहेत. ९० ते ९५ टक्के मिळवणारे विद्यार्थी ९४ हजार २९९ असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या २१ हजार ७०० ने वाढली आहे.

यंदा निकालाची टक्केवारी साधारण गेल्या वर्षीप्रमाणेच आहे. गेल्या वर्षी ८३.०१ टक्के निकाल जाहीर झाला होता तर यंदा निकालाची टक्केवारी ८३.४० आहे.

परीक्षेसाठी देशभरातील १२ हजार ४४१ शाळांतील १२ लाख १८ हजार ३९३ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. त्यापैकी १२ लाख ५ हजार ४८४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यातील १० लाख ५ हजार ४२७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकालही एका टक्क्याने यंदा वाढला असून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ९२.९३ टक्के आहे. सीबीएसईचे देशपातळीवर दहा विभाग आहेत. त्यात तिरुवनंतपुरम विभागाने ९८.२० टक्क्यांसह आघाडी मिळवली आहे.

अवघ्या २८ दिवसांत निकाल

देशभरात  १५ फेब्रुवारी ते ४ एप्रिल या कालावधीत ही परीक्षा घेतली होती. परीक्षेनंतर अवघ्या २८ दिवसांत निकाल जाहीर करत मंडळाने विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. आतापर्यंत मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल जाहीर होत असे. यंदा लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर मंडळाने लवकर निकाल जाहीर केला आहे.

यंदाही मुलींची आघाडी

* दर वर्षीप्रमाणेच यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली.

* उत्तीर्ण झालेल्या मुलींची टक्केवारी मुलांच्या टक्केवारीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी जास्त आहे.

* राष्ट्रीय पातळीवरील निकालातील पहिले तीन क्रमांक २३ विद्यार्थ्यांनी मिळवले आहेत. त्यात पहिला क्रमांक दोन विद्यार्थिनींनी, दुसरा क्रमांक तीन विद्यार्थिनींनी, तर तिसरा क्रमांक १८ जणांमध्ये विभागला गेला आहे. या १८ जणांमध्ये सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यामुळे पहिल्या तीन क्रमांकांसाठीच्या एकूण २३ विद्यार्थ्यांमध्ये १५ विद्यार्थिनी आहेत.