मुंबई: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) परीक्षेत आता वर्गात शिकलेल्या गोष्टींचा विद्यार्थ्यांना व्यवहारात वापर करता येतो का याच्या पडताळणीवर भर देण्यात येणार आहे. नववी ते बारावीच्या मूल्यमापन पद्धतीत बदल करण्यात आले असून आता कार्यक्षमतेची पडताळणी करणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण वाढवण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांनी शिकलेल्या पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्षात वापर करण्याची क्षमता सध्याच्या पद्धतीत विकसित होते का याबाबत चर्चा झडत असतात. यंदाच्या वर्षात उद््भवलेल्या परिस्थितीने अध्यापन पद्धती, परीक्षा पद्धती असे अनेक मुद्दे  ऐरणीवर आले आहेत. त्यानुसार परीक्षा पद्धत, अध्यापन पद्धतीत बदल करण्याचे विचार विविध स्तरांवरून वारंवार मांडण्यात येत आहेत.   सीबीएसईने या दृष्टीने एक पाऊल टाकलेले दिसत आहे. नववी ते बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना मिळालेल्या ज्ञानाचा वापर करता येतो का, प्रत्यक्ष कृती करता येते का याची पडताळणी करण्यात येणार आहे. आतापर्यंत विद्यार्थ्यांना विषय किंवा संकल्पना स्पष्ट झाली का याची पडताळणी करण्यावर भर देण्यात येत होता. मात्र आता कळलेल्या संकल्पनेचा वापर प्रत्यक्षात करता येतो का हे पाहिले जाणार आहे. त्यासाठी एखाद्या प्रश्नावर उपाय शोधणे, समस्या सोडवणे अशा स्वरूपातील प्रश्न विचारण्यात येतील. . येत्या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी होणार असून पुढील परीक्षेचे स्वरूप (२०२१-२२) नव्या प्रश्नरचनेनुसार असेल.

प्रश्नांची विभागणी कशी?

नववी आणि दहावीसाठी एकूण प्रश्नांमधील ३० टक्के प्रश्न हे कार्यक्षमतेवर आधारित असतील. २० टक्के प्रश्न बहुपर्यायी असतील, तर उर्वरित ५० टक्के प्रश्न हे दीर्घोत्तरी किंवा विश्लेषणात्मक उत्तरांचे असतील. अकरावी आणि बारावीसाठी कार्यक्षमतेवर आधारित प्रश्न २० टक्के, बहुपर्यायी २० टक्के आणि उर्वरित दीर्घोत्तरी प्रश्न असतील.