राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित रुग्णालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचा आणि आपत्कालीन कक्षाबरोबरच तात्काळ उपचार कक्षही सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे.
रुग्णालयातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच महत्त्वाच्या हालचाली टिपण्यासाठी कॅमेऱ्यांचा उपयोग होईल. तर तत्काळ उपचार कक्षात २४ तास विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर नियुक्त केले जाणार असल्याने रुग्णांवर लगेच उपचार सुरू होतील, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. विजयकुमार गावीत यांनी सांगितले.
निवासी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयांमध्ये संरक्षणासाठी शस्त्रधारी पोलिस ठेवण्याची मागणी केली आहे. अनेकदा अत्यवस्थ आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांचे निधन होते. त्या वेळी रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. तसेच प्रसूतीकक्षातून अर्भकांना पळविल्याच्या  घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे अतिदक्षता विभाग, आपत्कालीन कक्ष, प्रसूती विभाग आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. संशयितांच्या हालचाली टिपण्याबरोबरच नेमक्या कोणामुळे गोंधळ झाला, रुग्णाच्या नातेवाईकांचा दोष आहे की कर्मचाऱ्यांचा, आदी बाबींवरही लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे. प्रत्येक रुग्णालयात किमान १६ कॅमेरे बसविले जाणार असून त्यासाठी  सुमारे दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती डॉ. गावीत यांनी दिली.  गंभीर रुग्णाला आपत्कालीन कक्षात  आणल्यावर  तात्काळ वैद्यकीय मदत मिळावी यासाठी ‘तात्काळ उपचार कक्ष’ मोठय़ा शासकीय रुग्णालयात सुरू करून विविध तज्ज्ञ डॉक्टर तैनात केले जाणार असल्याचे  डॉ गावीत यांनी सांगितले.
सीसीटीव्हीचा उद्देश
अनेकदा अत्यवस्थ आणि गंभीर अवस्थेतील रुग्णांना दाखल केल्यावर त्यांचे निधन होते. त्या वेळी रुग्णाचे नातेवाईक डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करतात. तसेच प्रसूतीकक्षातून अर्भकांना पळविले जाण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. त्यामुळे अतिदक्षता विभाग, आपत्कालीन कक्ष, प्रसूती विभाग आदी महत्त्वाच्या विभागांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. संशयितांच्या हालचाली टिपण्याबरोबरच नेमक्या कोणामुळे गोंधळ झाला, रुग्णाच्या नातेवाईकांचा दोष आहे की कर्मचाऱ्यांचा, आदी बाबींवरही लक्ष ठेवता येणे शक्य होणार आहे.