विधानभवनाच्या आवारात आमदारांनी पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना केलेल्या मारहाणीचे सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये झालेले चित्रण अस्पष्ट असल्याचे राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी म्हटले आहे. कोणकोणत्या आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली, हे या चित्रणामधून स्पष्ट होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
१९ मार्च रोजी विधानभवनाच्या आवारात बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासह काही आमदारांनी सूर्यवंशी यांना मारहाण केली होती. या मारहाणीमुळे ठाकूर यांच्यासह राम कदम, प्रदीप जैस्वाल, जयकुमार रावळ आणि राजन साळवी यांना ३१ डिसेंबर २०१३पर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाळ, मुंबई गुन्हे शाखेचे सहआयुक्त हिमांशू राय यांच्यासह मी हे चित्रण पाहिले आहे. मात्र, मारहाण झाली, त्यावेळी तिथे कोणते आमदार होते, हे स्पष्ट दिसत नसल्याचे पाटील यांनी सांगितले.
विधानभवनाच्या परिसरात एकूण २८ कॅमेरे असले, तरी त्यातून नेमके काय घडले हे कोणत्याच कॅमेऱयामध्ये चित्रीत झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.