मुंबईतील सँडहर्स्ट रोड स्थानकात प्रवासी लोकल ट्रेनची वाट पाहत उभे होते. लोकल समोरुन येत होती तितक्यात प्रवाशांमध्ये उभी असणारी एक तरुणी अचानक खाली कोसळली. ट्रॅकपासून फार जवळ उभी असल्याने ही तरुणी ट्रॅकवर जाऊन कोसळली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ सुरु झाला. याचवेळी तिथे उपस्थित केंद्रीय रेल्वे दलाच्या जवानाने प्रसंगावधान दाखवत धाव घेतली आणि तरुणीचा जीव वाचवला. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गुरुवारी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. २३ वर्षीय अनीशा शेख सँडहर्स्ट रोड स्थानकावर लोकलची वाट पाहत उभी होती. यावेळी चक्कर आली आणि ती ट्रॅकवर जाऊन कोसळली. लोकल येत असल्याने तरुणी त्याच्याखाली जाईल या भीतीने प्रवासी हात दाखवून मोटरमनला लोकल थांबवण्याचा इशारा करु लागले.

याचवेळी तिथे उपस्थित रेल्वे कॉन्स्टेबल श्याम सुरत यांनी धाव घेतली. त्यांनी थेट ट्रॅकवर उडी मारली आणि प्रवाशांच्या मदतीने तरुणीला प्लॅटफॉर्मवर आणलं आणि जीव वाचवला. श्याम सुरत यांनी प्रसंगावधान दाखवलं नसतं तर अनर्थ घडला असता.