सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुंबई पुणे दरम्यान धावणाऱ्या इंटरसिटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेतच प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

सध्या इंटरसिटी एक्स्प्रेस मार्गस्थ झाली असून काही वेळात मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, एक्स्प्रेसमध्ये झालेल्या बिघाडामुळे कल्याणकडे जाणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या.

यापूर्वी रविवारी (1 सप्टेंबर) सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती. भांडुप ते कांजूरमार्गादरम्यान रेल्वे रूळाला तडे गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतूकीवर परिणाम झाला होता. रेल्वे रूळाला गेलेल्या तड्यांमुळे घाटकोपरहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या खोळंबल्या होत्या. त्याचा परिणाम जलद आणि धिम्या मार्गावरील लोकल सेवेवर झाला होता. मेगा ब्लॉकबरोबरच आज लोकल उशिराने सुरू असल्याने प्रवाशांनी संतप्त झाल्याचे पहायले मिळाले होते.