इंद्रायणी नार्वेकर

महत्त्वाचे पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्याच्या हालचाली; टिळक, प्रभादेवी पुलांवरील भार वाढणार

घाटकोपर-अंधेरी लिंक रोड आणि जुहू तारा रोड येथील धोकादायक उड्डाणपूल बंद केल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरात जसा प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे, तशीच परिस्थिती येत्या काळात मध्य व दक्षिण मुंबईची होणार आहे. लोअर परळनंतर या भागाची प्रमुख भिस्त असलेले करी रोड, चिंचपोकळी, भायखळा येथील पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्याच्या हालचाली पालिका प्रशासनाने सुरू केले आहेत. त्यामुळे अवजड वाहनांची सगळी भिस्त फक्त प्रभादेवी आणि दादरच्या टिळक पुलावर राहणार असल्याने येत्या काळात दादर ते लालबाग, परळ, वरळी या भागात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.

पालिकेने सल्लागारांकडून केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील २९ पूल धोकादायक आढळले असून ते पाडण्यात येणार आहेत. अनेक भागातील सर्वेक्षण अद्याप सुरू असून येत्या काळात हा आकडा आणखी वाढणार आहे. पालिकेच्या सर्वेक्षणाबरोबरच रेल्वे आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांनी मिळून रेल्वेवरील उड्डाणपुलांचे सर्वेक्षण केले होते. त्यात चिंचपोकळी, भायखळा, करी रोडचे पूल धोकादायक आढळले आहेत. हे पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात येणार असून तशी कारवाई करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाने संबंधित पूल विभागाला दिले आहेत. या तीनही पुलांवर उंची अटकाव लावण्यात येणार असून वाहनांचा वेगही ताशी ३० किमीपर्यंत मर्यादित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार या तीनही पुलावरील जुन्या उपयोगिता वाहिन्या, जलवाहिन्या काढून टाकण्याची कारवाई पूर्ण झाली आहे. तसेच, चिंचपोकळी व करीरोडच्या पुलावर गतिरोधकही लावण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि ना. म. जोशी मार्ग यांना जोडणारे चिंचपोकळी व करी रोडचे पूल बंद झाल्यास या पुलावरील संपूर्ण वाहतूक प्रभादेवी आणि टिळक पुलाकडे वळण्याची शक्यता आहे. त्यापैकी टिळक पुलाच्या क्षमतेबद्दल आधीच तांत्रिक सल्लागारांमध्ये वाद आहेत. तर प्रभादेवीचा पूलही जुना आहे. त्यात या दोन पुलांवरील वाहतुकीचा ताण वाढणार आहे. आधीच लोअर परेल पूल पाडून टाकल्यामुळे प्रभादेवी परिसरात संध्याकाळच्या वेळी खूप वाहतूक कोंडी होते. त्यात आता आणखी भर पडणार आहे.

पर्यटन गाडय़ा, रुग्णवाहिकांना फटका

प्रभादेवीच्या पुलावरून परळ एसटी डेपोतून सुटणाऱ्या बसगाडय़ा, बेस्टच्या बसगाडय़ा जात असतात. याच परिसरात कोकणात जाणाऱ्या टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या खासगी गाडय़ांची सतत ये-जा सुरू असते. त्यातच केईएम आणि टाटा रुग्णालयाकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकाही या वाहतूक कोंडीत सापडलेल्या असतात. रोजच संध्याकाळी दिसणारी ही वाहतूक कोंडी येत्या काळात भीषण होण्याची शक्यता आहे.

धोकादायक पुलांची संख्या वाढणार

पालिकेने पश्चिम आणि पूर्व उपनगरातील पुलांचे सर्वेक्षण केले आहे, तर शहर भागातील ८१ पुलांचे सर्वेक्षण करण्यासाठी नुकतेच सल्लागार नेमले आहेत. याचा अहवाल हाती आल्यानंतर धोकादायक पुलांची संख्या अजून वाढण्याची शक्यता आहे.

पुलांची पुनर्बाधणी रखडलेली

पाडून टाकलेल्या सॅंण्डहर्स्ट रोड पूल, शिवडी पूल, लोअर परळ पूल या पुलांची पुनर्बाधणी विविध कारणांमुळे रखडली आहे. त्यामुळे सगळ्या मुंबईच्या वेगालाच गतीरोधक लागण्याची शक्यता आहे.