अकरावीला २० टक्के, तर बारावीला ८० टक्के प्राधान्य

राज्यातील अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (एमएच-सीईटी)अभ्यासक्रम तंत्रशिक्षण संचालनालयाने अखेर गुरुवारी जाहीर केला आहे. यामध्ये अकरावीच्या अभ्यासक्रमास २० टक्के, तर बारावीच्या अभ्यासक्रमास ८० टक्के या सूत्रानुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात आलेला आहे. ऑक्टोबर महिना उजाडला तरी मेमध्ये होणाऱ्या या परीक्षेचे वेळापत्रकच जाहीर न झाल्याने विद्यार्थी चिंतेत होते.

तंत्रशिक्षण संचालनालयाने परीक्षेचा अभ्यासक्रम आणि गुणांची विभाजनी परिपत्रकाद्वारे गुरुवारी जाहीर केल्याने या विद्यार्थ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांत म्हणजेच २०१८-१९ मध्ये अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमातील प्रथम वर्षांच्या प्रवेशासाठी राज्यस्तरावर घेण्यात येणारी सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) ही संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) धर्तीवर घेण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय फेब्रुवारी २०१७ मध्येच जाहीर करण्यात आला होता. मात्र परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत तंत्रशिक्षण संचालनालयाकडून कोणतीही सूचना न मिळाल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण होते. तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार सामायिक प्रवेश परीक्षा ही अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारभूत असणार आहे. या परीक्षेतील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांचा दर्जा हा संयुक्त प्रवेश परीक्षेप्रमाणे असणार आहे, तर जीवशास्त्र विषयाचा दर्जा हा राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेप्रमाणे (नीट) असणार आहे.

नकारात्मक मूल्यांकन नाही

अकरावीच्या अभ्यासक्रमास २० टक्के तर बारावीच्या अभ्यासक्रमास ८० टक्के प्राध्यान्य देण्यात आले आहे. तसेच या प्रवेश परीक्षेमध्ये नकारात्मक मूल्यांकन नसणार आहे. नव्या अभ्यासक्रमामध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांमध्ये ४० गुणांचे प्रश्न हे बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेले असणार आहेत. तर १० गुणांचे प्रश्न हे अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारलेले असणार आहेत. सर्व विषयांच्या परीक्षा या १०० गुणांच्या असणार असून अकरावीच्या विषयानुसार कोणत्या पाठांचा समावेश करण्यात आला आहे हे  तंत्रशिक्षण विभागाने जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद केले.