‘कार्यकर्त्यांच्या शोधासाठी दुर्बीण’

‘अनेक महत्त्वाच्या पदांसाठी चारित्र्यवान माणसे मिळणे कठीण झाले आहे, ती दुर्बीण घेऊन शोधावी लागतात’, या विधानामुळे भाजपमध्ये पसरलेला असंतोष शमविण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. कार्यकर्त्यांस दुखावण्याचा माझा हेतू नव्हता तर शिक्षक शिबिरात शिक्षकांना उद्देशून केलेले ते प्रासंगिक आवाहन होते, अशी सारवासारवही त्यांनी केली आहे.

बीड जिल्ह्य़ात माजलगाव येथे गेल्या २५ डिसेंबर रोजी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या एका समारंभात बोलताना चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पक्षात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. पक्षात प्रामाणिक कार्यकर्ते नाहीत का, असा जाब असंख्य कार्यकर्ते थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विचारू लागले होते. अनेकांनी तर पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आपली नाराजी नोंदविल्याने अखेर त्याची दखल घेऊन चंद्रकांतदादा पाटील यांनी एका खुल्या पत्राद्वारे पुन्हा कार्यकर्त्यांशी पक्षाच्या मुखपत्राद्वारे सुसंवादाचा प्रयत्न केला. प्रदेश भाजपच्या मनोगत या पाक्षिकाच्या ताज्या अंकात ‘कार्यकर्त्यांनो, गैरसमज करून घेऊ नका’ अशी साद घालणारे हे खुले पत्र दादांनी सहीनिशी जारी केले.

‘देशाचा विकास झपाटय़ाने होत आहे, रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. जवळपास ६० टक्के लोकांची दोन वेळच्या उदरनिर्वाहाची समस्या सुटली, पण आता गरज आहे ती चारित्र्य निर्माणाची. अनेक महत्त्वाच्या पदांसाठी चारित्र्यवान माणसे मिळणे कठीण झाले असून ती दुर्बीण घेऊन शोधावी लागतात. अशी माणसे तयार करणे हे शिक्षकांचे काम आहे’ असे आपण त्याप्रसंगी बोलताना म्हटले होते, असे पाटील यांनी या पत्रात स्पष्ट केले आहे. जानेवारीत महामंडळांच्या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे, त्यासाठी योग्य माणसे निवडण्याचे काम चालू आहे, अशी माहितीही पाटील यांनी या पत्रातून कार्यकर्त्यांना दिली आहे. त्या कार्यक्रमात आपण जे बोललो त्यामागे कार्यकर्त्यांना दुखावण्याचा हेतू नव्हता, असे म्हटले आहे.