मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन; ‘माझी वसुंधरा’ अभियानातील विजेत्यांचा गौरव

मुंबई : पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करण्याचा संस्कार आपल्या भारतीय संस्कृतीने दिला असून विकास कामांचे नियोजन करताना ते निसर्गाचे नियम समजून घेऊन करणे आवश्यक आहे. अन्यथा निसर्ग आपल्या पद्धतीने न्याय देण्याचे काम करतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात २०२०-२१ या वर्षात ‘माझी वसुंधरा’ अभियानात सर्वोतकृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगर परिषदा, अमृत शहरांचा तसेच अभियानात सर्वोत्तम काम करणारे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या अभियानाच्या २०२१-२२ या वर्षातील अंमलबजावणीचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वन विभागाच्या कांदळवन कक्षाने तयार केलेल्या ‘बायोसेंटिनल्स ऑफ कोस्टल महाराष्ट्र’ या कॉफीटेबल बुकचे प्रकाशन करण्यात आले.

आपली संस्कृती ही पर्यावरणाची जपणूक करणारी संस्कृती होती, त्यामुळेच आपल्याकडे वटपौर्णिमेला वडाची पूजा, नागपंचमीला नागांची पूजा केली जाते. परंतु आता आपल्या घरासमोर साधे तुळशी वृंदावन बांधण्याला जागा नाही, इतक्या इमारती उभ्या राहात आहेत.  वन आणि वन्यजीवांचे, पर्यावरणातील प्रत्येक सूक्ष्म घटकांचे महत्त्व आणि त्याचे  रूप आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि ते समजून घेता येत नसले तरी ते जपण्याची आणि त्याचे संवर्धन करण्याची गरज आहे, तिथे कुणीही कमी पडता कामा नये, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

कामात सातत्य हवे – उपमुख्यमंत्री

पर्यावरण रक्षणाचे काम हे काही एक दिवसाचे किंवा काही दिवसांचे नाही, त्यामुळे पुरस्कार मिळवलेल्या आणि माझी वसुंधरा अभियानात सहभागी झलेल्या सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांनी या कामात सातत्य ठेवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

प्रास्ताविकामध्ये पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी  माझी वसुंधरा अभियानाच्या यशाची माहिती दिली. सूत्रसंचालन करताना पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी अभियानाची रूपरेषा सांगितली. निवृत्त संचालक (माहिती) प्रल्हाद जाधव लिखित माझी वसुंधरा अभियान गीताचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

पुरस्कार विजेते

ठाणे मनपा, हिंगोली नगर परिषद, शिर्डी नगरपंचायत आणि पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला प्रथम पुरस्कार

यावेळी ऑनलाइन पद्धतीने माझी वसुंधरा अभियान पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अमृत शहरे गटामध्ये ठाणे, नवी मुंबई आणि बृहन्मुंबई महापालिका यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ हा पुणे महापालिकेने, तर उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ हा नाशिक महापालिका आणि बार्शी नगर परिषद (जि. सोलापूर) यांना विभागून प्रदान करण्यात आला.

नगर परिषद गटामध्ये हिंगोली (जि. हिंगोली), कराड (जि. सातारा) आणि जामनेर (जि. जळगाव) यांनी प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. परळी (जिल्हा बीड) नगर परिषदेला उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक १ आणि वैजापूर (जिल्हा औरंगाबाद) आणि संगमनेर (जि. अहमदनगर) यांना विभागून उत्तेजनार्थ पुरस्कार क्रमांक २ प्रदान करण्यात आला. नगरपंचायत गटामध्ये शिर्डी (जि. अहमदनगर), कर्जत (जि. अहमदनगर) आणि मलकापूर (जि. सातारा) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. तर निफाड (जि. नाशिक) आणि मुक्ताईनगर (जि. जळगाव) यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कार पटकावला.

ग्रामपंचायतींमध्ये पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक), मिरजगाव (जि. अहमदनगर) आणि चिनावल (जि. जळगाव) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. पहुर पेठ (जि. जळगाव) आणि लोणी बुद्रुक (जि. अहमदनगर) यांना अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक १ आणि २ चा पुरस्कारप्रदान करण्यात आला.

उत्कृष्ट कामगिरीसाठी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये प्रथम पुरस्कार जळगाव जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि अहमदनगर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना विभागून प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना द्वितीय पुरस्कार विभागून देण्यात आला. नाशिक जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये जळगाव जि.प.चे डॉ. बी. एन. पाटील, अहमदनगरचे राजेंद्र क्षीरसागर आणि नाशिकच्या लीना बनसोड यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.