मंत्रिमंडळाच्या विस्तारात १३ नव्या मंत्र्यांना स्थान देण्यात आले मात्र, सहा विद्यमान मंत्र्यांना वगळण्यात आले. या मंत्र्यांना पायउतार करण्यात आले हा कोणाच्याही अकार्यक्षमतेवर ठेवलेला ठपका नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीची रणनीती म्हणून केलेला बदल असल्याचे सूचक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी रविवारी पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

नव्या मंत्रिमंडळ विस्तारात १३ नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे आणि अंबरिश अत्राम या ६ विद्यमान मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, या मंत्र्यांच्या अकार्यक्षमतेमुळे त्यांना मंत्रीपदं गमवावी लागली का? या पत्रकारांच्या प्रश्नाचा मुख्यमंत्रांनी इन्कार केला.

मुख्यमंत्री म्हणाले, काहीजण म्हणतात की या सरकारचे चार-सहा महिने राहिलेले असताना मंत्रिमंडळाचा विस्तार कशासाठी केला जातोय. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीनंतरही सरकार आमचेच राहणार आहे. त्यामुळेच काही नव्या लोकांना संधी द्यायची होती, काही प्रादेशिक राजकारणाची गणितं असतात याचा विचार करुन आधी काही जणांना संधी दिली त्यानंतर आता दुसऱ्यांना संधी दिली. त्यामुळे कोणी खूपच वाईट कामगिरी करीत होत किंवा कोणावर आरोप झाले म्हणून त्यांना वगळण्यात आलं असं नाही. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हे नवे चांगले काम करतील असा आम्हाला विश्वास आहे.

विजयसिंह मोहिते-पाटील आणि रणजीतसिंह मोहिते-पाटील यांना कधी कुठे समावून घ्यायचं हे आमचं आधीचं ठरलेलं आहे. या दोघांनीही या निवडणुकीत आम्हाला प्रचंड मदत केली. माढ्याची जागा निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. रणजीतसिंह आता आमच्या पक्षात आलेले आहेत त्यामुळे योग्य सन्मान आम्ही ठेवणार आहोत.