शिवसेनेनेच्या प्रयत्नांशिवाय अयोद्धेतील राम मंदिराचा शिलान्यास अशक्य आहे असे मत राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख जनमेजयशरणजी महाराज यांनी व्यक्त केल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच लवकरच उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. मंदिर निर्मितीसाठी उद्धव ठाकरे स्वतः अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या हस्ते राम मंदिराची वीट रचली जाणार आहे. दसऱ्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत असेही समजते आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिर न्यायासाचे अध्यक्ष जनमेयशरणजी महाराज यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तसेच त्यांना अयोध्येला येण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले आहे. दसरा झाल्यानंतर उद्धव ठाकरे तमाम शिवसैनिकांसह अयोध्येला रवाना होतील आणि ही तारीख काय असेल ते दसरा मेळाव्यात जाहीर करतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

भाजपा सरकार केंद्रात असूनही राम मंदिर उभारणीचा निर्णय घेत नाहीत याबाबत पत्रकारांनी विचारले असता, सत्तेत भाजपा असूनही राम मंदिर उभारले जात नाही हे हिंदुत्त्वाचे दुर्दैव आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. केंद्र सरकार एससी-एसटी कायद्यासह अनेक विषयांवर अध्यादेश काढण्यात आला पण राम मंदिर निर्मितीबाबत अध्यादेश का काढू शकत नाही असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.