चर्चगेट परिसरातील रहिवाशांसह नोकरदारांचीही कोंडी

मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी चर्चगेट, नरिमन पॉइंट परिसरात राहणाऱ्यांनाच नव्हे तर या परिसरात नोकरी वा कामधंद्यानिमित्त येणाऱ्या सामान्य मुंबईकरांनाही अडीच वर्षे रस्ताबंदीचा त्रास सहन करावा लागणार आहे. मेट्रो-३च्या चर्चगेट स्थानकाचे बांधकाम करण्यासाठी चर्चगेट रेल्वे स्थानकाहून मंत्रालयाकडे जाणाऱ्या जे. टाटा मार्गाचा अर्धा भाग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. हे काम पूर्ण होण्यास किमान अडीच वर्षांचा कालावधी लागणार असून तितका काळ हा रस्ता बंद राहणार आहे. त्यामुळे या मार्गाने ये-जा करणाऱ्या पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होते आहे. तसेच, वाहनचालकांनाही या मार्गावर कोंडीचा सामना करावा लागत आहे.

चर्चगेट रेल्वे स्थानकापासून मंत्रालयाकडे जाणाऱ्या जे. टाटा मार्गावरील चर्चगेटकडे येणारा रस्ता याआधी अंशत: वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता; परंतु आता एका बाजूच्या पदपथाबरोबरच अर्धा रस्ता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ताब्यात घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या उर्वरित अध्र्या भागात दोन्ही दिशांनी जाणारी वाहने आणि पादचारी यांना ये-जा करावी लागते आहे. यामुळे या परिसरात कामधंद्यानिमित्त येणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याचबरोबर या भागातील रहिवाशांना त्यांचे वाहन मरिन लाइन्स किंवा महर्षी कर्वेमार्गे वळसा घालून आणावे लागत आहे.

या परिसरातील जे. टाटा मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावर मरिन लाइन्सकडून मधल्या रस्त्याने चर्चगेटकडे जाणारी वाहने येतात, तर केसी महाविद्यालयासमोरील रस्त्यावरील वाहने मरिन लाइन्सकडे जाण्यासाठी या मार्गावरून येत असतात. यामुळे हा रस्ता रहदारीचा मानला जातो. याचबरोबर या परिसरात सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालये असल्यामुळे येथे पादचाऱ्यांचीही वर्दळ असते. यामुळेच महापालिकेने या भागातील पदपथही मोठे होते. काही महिन्यांपासून या भागातील मंत्रालयाच्या दिशेने जाणारे पदपथ व रस्त्याचा काही भाग बंद ठेवण्यात आला होता. आता शुक्रवार मध्यरात्रीपासून चर्चगेटहून मंत्रालयाकडे जाणारा अर्धा रस्ताच बंद ठेवण्यात आला आहे.

या रस्त्यावरील वाहनांनी या मार्गाने कसा प्रवास करावा, याबाबत कोणतीही सूचना कामाच्या ठिकाणी लावण्यात आलेली नाही. यामुळे येथे येणाऱ्या वाहनांचा गोंधळ उडतो. वाहने ज्या वेळेस काम सुरू असलेल्या ठिकाणापर्यंत येतात तेव्हा तेथील वाहतूक मार्गदर्शक त्यांना दिशा दाखवितात. यामुळे अनेकदा वाहनांना पुन्हा मागे फिरावे लागते. परिणामी सकाळी कार्यालय सुरू होण्याच्या वेळात या परिसरात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते.

बेस्टचा मार्गही बदलला

या मार्गावर काम सुरू असल्यामुळे बेस्टच्या ९२, २१ आणि १३४ या मार्गावरील बस मादाम कामा मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. याचा फटका या भागातील रहिवाशांना बसत आहे.

‘परवानगी घेतली होती’

या परिसरात चर्चगेट स्थानक बांधण्याचे काम सुरू आहे. या कामाचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असून आता लवकरच जमिनीखाली काम सुरू होणार आहे. यासाठी वाहतूक पोलीस विभागाच्या पूर्वपरवानगीने जे. टाटा मार्गावरील वाहतूक मरिन लाइन्स रोड आणि महर्षी कर्वे मार्ग येथून वळविण्यात आली आहे, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले.

रस्त्यावर स्टीलचे ‘डेकिंग’

हे काम पूर्ण होण्यासाठी अडीच वर्षांचा कालावधी लागणार असून त्या कालावधीपर्यंत हा रस्ता बंद राहणार असल्याचे मेट्रो-३च्या प्रवक्त्याने सांगितले. सुरुवातीला रस्त्याच्या पश्चिमेकडील भाग बंद ठेवण्यात आला आहे. याचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर स्टीलचे डेकिंग तयार करून काही प्रमाणात वाहतूक सुरू होईल. यानंतर पूर्व दिशेकडील मेट्रो स्थानकाचे काम सुरू केले जाईल, असे मेट्रो-३च्या वतीने सांगण्यात आले.

जे. टाटा मार्गावरील वाहतूक बंद करून ती महर्षी कर्वे मार्गावरून वळविण्यात येणार असल्याची कोणतीही पूर्वसूचना येथील रहिवाशांना देण्यात आली नव्हती. इतकेच नव्हे तर या भागात ‘नो पार्किंग’चे फलकही लावण्यात आले आहेत. या भागात ५०हून अधिक वर्षे गाडय़ांचे पार्किंग करणाऱ्या रहिवाशांचा मेट्रो-३च्या प्रशासनाने कोणताही विचार केला नाही. यामुळे  यासंदर्भात येथील रहिवाशांशी चर्चा करावी अशी मागणी करणारे पत्र आम्ही दिले आहे.

– अशाद मेहता, अध्यक्ष, ओव्हल कुपरेज रेसिडेंट असोशिएशन