प्रत्येक गुन्हा नोंदविण्याचे आदेश पोलीस आयुक्त राकेश मारीया यांनी दिल्यामुळे मुंबईतील ९३ पोलीस ठाण्यांत गुन्हे वाढल्याचे दिसून येत आहे. या सर्व गुन्ह्य़ांची उकल व्हावी यासाठी आता पोलीस ठाण्यातही गुन्हे अन्वेषणात वाकबगार असलेल्या अधिकाऱ्यांचे खास पथक नियुक्त करण्यात येणार आहे. गुन्हे अन्वेषण विभागाप्रमाणेच हे पथक काम करील आणि या पथकातील अधिकाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मुंबई पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे सहआयुक्त देवेन भारती यांनी हा निर्णय घेतला आहे.
रस्त्यावर पोलिसांचा वावर दिसला पाहिजे, यावर भर असून त्यानुसार पोलीस ठाण्यांना ठिकाणे निश्चित करण्यात सांगण्यात आली आहेत. त्यानुसार पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच पोलिसांचा वावर रस्त्यावर अधिक दिसला पाहिजे.  गुन्हे घडण्याची वेळ प्रामुख्याने पहाटेपासून सुरू होते. तेव्हापासून पोलिसांनी अधिक सतर्क असायला हवे, असेही आदेश जारी करण्यात आले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्ह्य़ांची नोंद झाली तर त्याची उकलही व्हायला हवी. त्यासाठी गुन्हे अन्वेषणात माहिर असलेले अधिकारी असावेत, असा माझा प्रयत्न असल्याचेही भारती यांनी स्पष्ट केले.