आपल्या अनुपस्थितीत विरोधी पक्षनेतेपदाची धूरा कनिष्ठ नगरसेवकाच्या खांद्यावर सोपवून ज्ञानराज निकम यांनी स्वपक्षातील ज्येष्ठ नगरसेवकांना चांगलीच चपराक दिली आहे. काँग्रेसमधील गटातटाचे राजकारण आणि नगरसेवकांमधील सुंदोपसुंदी यामुळे विरोधी पक्षाची धार बोथट झाली आहे.
पालिका निवडणुकीनंतर बहुमताने हुलकावणी दिल्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागले. काँग्रेसमधील मातब्बल उमेदवारांचा पराभव झाल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची लॉटरी कोणाला लागणार याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. विरोधी पक्ष नेतेपदासाठी ज्येष्ठ नगरसेवक सुरेश कोपरकर, ज्ञानराज निकम, नगरसेविका शीतल म्हात्रे, भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये आलेले प्रवीण छेडा यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांच्या गटातटातील राजकारणात अखेर विरोधी पक्षनेतेपदाची माळ ज्ञानराज निकम यांच्या गळ्यात पडली. मृदू स्वभावाचे निकम मौनीबाबा म्हणूनच पालिकेत ओळखले जातात. परिणामी पक्षातील प्रतिस्पध्र्यानी पहिल्या दिवसापासून त्यांच्यावर कुरघोडी करायला सुरुवात केली.