मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा राज्य मंडळाने अखेर जाहीर केल्या असून यंदा १८ फेब्रुवारीपासून बारावीची तर ३ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे.

शाळांचे पहिले सत्र संपल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याचा मुहूर्त महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला मिळाला आहे. विविध प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या तरी राज्य मंडळाने परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थी-पालकांमध्ये अस्वस्थता होती. अखेर मंडळाने परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर केल्या आहेत. बारावीची नियमित, द्विलक्षी आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे.

दहावीची परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत होणार आहे. या वेळापत्रकावर आक्षेप घेण्यासाठी मंडळाने पंधरा दिवसांची मुदत दिली आहे.  दोन्ही परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या http://www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिवाळीच्या सुट्टीत अर्ज भरण्याची सूचना

दहावीचे अर्ज भरण्याची सुरुवात १५ ऑक्टोबरपासून करण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिल्या आहेत. नियमित शुल्कानुसार अर्ज भरण्यासाठी ५ नोव्हेंबर तर विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी १६ ते २५ नोव्हेंबपर्यंत मुदत आहे. मात्र, सध्या सत्र परीक्षा सुरू आहेत. दिवाळीच्या सुटीनंतर शाळा ११ नोव्हेंबरनंतर सुरू होणार आहेत. तोपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत उलटून जाते. त्यामुळे शाळांना विलंब शुल्काचा फटका सहन करावा लागणार आहे. ‘दिवाळीच्या सुट्टीत फक्त अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलावणे शक्य नसते. यंदा शिक्षक, कर्मचारी निवडणुकीच्या कामात अडकले आहेत,’ असे एका मुख्याध्यापकांनी सांगितले.