गावदेवीतील मंडईत ७५ टक्के ओटय़ांवर अन्य व्यवसाय

ठाणे : ठाणे स्थानकाच्या पश्चिमेकडे गावदेवी भागात महापालिकेने भाजी विक्रेत्यांसाठी उभारलेल्या मंडईत कपडे आणि अन्य वस्तूंच्या विक्रीचा बाजारच अधिक भरल्याचे दिसून येत आहे. या मंडईतील १५४ पैकी शंभर ओटय़ांवर कपडे तसेच अन्य साहित्यांची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले असून सर्वसाधारण सभेत यासंबंधीची माहिती उघड करण्यात आली. दरम्यान, असा वापर बदल करून व्यवसाय करणाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

ठाणे शहरातील नागरिकांना भाजी खरेदीसाठी मंडई उपलब्ध व्हावी तसेच रस्ते व पदपथ अडवून भाजी विक्री होऊ नये, या उद्देशातून महापालिकेने विविध भागात भाजी मंडईची उभारणी केली आहे. त्यामध्ये ठाणे पश्चिम स्थानकाजवळील गावदेवी भागात भाजी मंडई उभारण्यात आली आहे. ५० वर्षे जुन्या असलेल्या भाजी मंडईचे काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करून त्या ठिकाणी १५४ ओटले बांधण्यात आले. या ओटल्यांवर भाजी विक्रीसाठी प्रत्येक विक्रेत्यांकडून वर्षांला ३६०० रुपये इतके नाममात्र भाडे घेतले जाते. मात्र, या मंडईचा वापर भाजी व्यतिरिक्त अन्य साहित्य विक्रीसाठी होत असल्याची बाब भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी सर्वसाधारण सभेत उघड केली.

गावदेवी भाजी मंडईतील १५४ पैकी १०० ओटल्यांवर भाजी व्यतिरिक्त अन्य व्यवसाय केले जात आहेत. त्यामध्ये कपडे आणि सौंदर्य प्रसाधनाची साहित्य विक्री केली जात आहे. केवळ ५४ ओटलेधारकांकडूनच भाजी विक्री केली जात असून उर्वरित शंभर ओटलेधारकांकडून कोणत्याही परवानगीविना व्यवसाय वापर बदल करण्यात आला आहे, अशी माहिती वाघुले यांनी सभागृहात दिली. ही बाब मान्य करत अशा ओटलेधारकांना नोटिसा बजावण्यात आल्याचे पालिका उपायुक्त मनीष जोशी यांनी सभागृहात सांगितले. मात्र, नोटिसा बजावून आठ महिन्यांचा काळ लोटला असल्यामुळे प्रत्यक्ष कारवाई करण्याची मागणी वाघुले यांनी केली.  ओटलेधारकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी स्पष्ट केले.

गोखले मार्गावर फेरीवाले

ठाणे स्थानकातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोखले मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाले बसू लागले असून अशा फेरीवाल्यांविरोधात कारवाई होत नसल्याचा आरोप वाघुले यांनी सभागृहात केला. तसेच अतिक्रमण पथकातील काही कर्मचारी फेरीवाल्यांसोबत गप्पा मारत उभे असतात, असा दावाही त्यांनी यावेळी केला. या संदर्भात तात्काळ माहिती घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या अन्यत्र करण्यात येतील असे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले.