वारकऱ्यांना वेठीस धरल्याबद्दल मराठा आंदोलकांवर टीका

मुंबई : मुख्यमंत्र्यांना कोणीही रोखू शकत नाही, पण १० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होईल असे प्रयत्न केले जात आहेत. पोलिसांकडून तसे संदेश प्राप्त झाले. त्यात वारकऱ्यांमध्ये साप सोडणे, चेंगराचेंगरी होऊन त्यांच्या जीविताला हानी पोहोचविण्याचा कट रचला जात होता. हे अतिशय वाईट आहे. त्यामुळे १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी या पूजेला न जाण्याचा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी जाहीर केले.

पुरोगामी महाराष्ट्राला लज्जा आणणारा हा प्रकार आहे. कारण वारकऱ्यांना धक्का जरी लागला तरी, महाराष्ट्राला कधी कोणी माफ करणार नाही. त्यामुळे आता माझ्या विठ्ठलाची पूजा मी माझ्या घरी करेन, असेही ते म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून राज्यात काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यात मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात विठ्ठल पूजा करू दिली जाणार नाही, असाही इशारा काही संघटनांनी दिला होता. या पाश्र्वभूमीवर पंढरपुरात आषाढी एकादशीनिमित्त सोमवारी नेमके काय होणार, याविषयी संभ्रम निर्माण झाला होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नाटय़मय घोषणेमुळे या शंकाकुशंकांना पूर्णविराम मिळाला.

‘महाराष्ट्रात वारीची परंपरा ७०० वर्षांपासून आहे. वारीला छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील संरक्षण दिले होते. त्यामुळे त्या काळातही वारी अबाधित राहिली. आषाढी एकादशीची पूजा मुख्यमंत्र्यांनी करण्याची गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे. ही पूजा राज्यातील १२ कोटी जनतेचा प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री करीत असतात. विठ्ठलाचा सेवक म्हणून हा मान मुख्यमंत्र्यांना असतो. आजवर ५ ते ६ वेळा ही परंपरा खंडित झाली. काही संघटनांनी अशी भूमिका घेतली की, जोपर्यंत मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत ७६ हजार पदांची मेगा भरती रद्द करावी. तोवर आम्ही मुख्यमंत्र्यांना शासकीय महापूजेला येऊ  देणार नाही. वारीच्या संदर्भात ही भूमिका अत्यंत चुकीची आहे. वारी ही राजकीय आणि सामाजिक अभिनिवेशापलीकडे असली पाहिजे,’ असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना जाहीर केले. मुख्यमंत्र्यांच्या अडवणुकीचा प्रकार वारकऱ्यांनाही वेठीस धरणारा आहे. असे लोक छत्रपतींचे मावळे कधीही असू शकत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मराठा आरक्षणाचा निर्णय हा उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयाने मागासवर्ग आयोग नेमल्याशिवाय निर्णय होऊ  शकत नाही, असे सांगितल्याने राज्य सरकारने आयोग नेमला. दुर्दैवाने अध्यक्षांचे निधन झाले आणि आता दुसरे अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. जनसुनावणी होऊन काम अंतिम टप्प्यात आहे. ही प्रक्रिया पाहता हे सर्वाना समजते की, पुढचा निर्णय न्यायालयातच होईल. तरीही काही पक्ष आणि संघटना राजकीय भावनेतून तेढ निर्माण करण्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा धोक्यात आणत आहेत. माझ्यावर दगडफेक करून आरक्षण मिळणार असेल, तर त्याचीही माझी तयारी आहे. हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारा नाही. यामुळे स्वत:ला पुरोगामी म्हणवणाऱ्या नेत्यांचा बुरखा फाटला आहे, असेही फडणवीस यांना सुनावले.

ज्या ७२ हजार मेगाभरतीवर आक्षेप घेतला जातोय, त्यात खरे तर आरक्षणाचा निर्णय गृहीत धरून १६ टक्के जागा अनुशेषातून भरण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मेगाभरती थांबली तर एससी/ एसटी/ ओबीसीचे नुकसान होईल. खुल्या गटातून जे मराठा युवक नोकरीत लागतील, त्यांचे नुकसान होणार. ज्यांचे वय पात्रतेतून बाद होते. अशा पात्र मराठा युवकांचे नुकसान होणार. भरती थांबवली तर अनेक लोक वंचित राहतील. असे असले तरी १६ टक्के जागा या अनुशेष म्हणून राखीव ठेवण्यात येतील. काही लोक राजकारण करीत आहेत. शाहू, फुले, डॉ. आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेताना, त्यांच्याच विचारांना हरताळ फासणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने कोणीही हात लावू शकत नाही. परंतु १० लाख वारकऱ्यांच्या जिवाला धोका होऊ  नये यासाठी पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते पूजा होईल. पालकमंत्री, जिल्हाधिकारी या वेळी हजर राहतील.

– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री