भारतीय प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात आणि आनंदात साजरा होत असताना विरोधकांनी मुंबईत संविधान बचाव रॅली काढली होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीवर कठोर शब्दात टीका केली आहे. काही लोक वल्गना करतात की संविधान वाचवले पाहिजे. पण तुम्ही आहात कोण संविधान वाचवणारे? संविधानाची ताकद इतकी मोठी आहे की हे संविधान कोणीही संपवू शकत नाही. हे संविधान वाचवण्यासाठी तुमच्यासारख्यांची आवश्यकता नाही असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

देशाचे संविधान वाचवण्यासाठी नाही तर पक्ष वाचवण्यासाठी  रॅली  काढण्यात आली असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. भाजपने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत तिरंगा यात्रा आयोजित केली होती. या यात्रेची सांगता परळ येथील कामगार मैदानात झाली. त्याचवेळी बोलताना मुख्यमंत्री विरोधकांवर गरजले.

भारताचे संविधान स्वयंभू आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्यावेळी भारताला संविधान दिले ते सर्वोत्तम संविधान आहे. मी दावा करतो की जगाच्या पाठीवर दुसऱ्या कोणत्याही देशाचे संविधान इतके सर्वोत्तम नाही. भारत लोकशाही देश आहे. त्याचे कारणच भारताचे संविधान बळकट आहे. शेजारी देशांमध्ये पाहा लोकशाही नांदू शकत नाही मात्र भारताचे तसे नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हे संविधान कोणीही संपवू शकत नाही. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून लोकशाही पायदळी तुडवली मात्र लोकांनी त्यांना निवडणुकांमध्ये नाकारले. संविधानाची ताकद काय आहे याचा अनुभव इंदिरा गांधींनी त्यावेळी घेतला.

विरोधक संविधान बचाव रॅली काढून भाजपवर टीका करत आहेत. मात्र त्यांच्या पक्षांच्या अस्तित्त्वासाठी ही रॅली काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली सुरु असलेल्या सरकारमध्ये या विरोधी पक्षांना अस्तित्त्वच उरलेले नाही. त्याचमुळे त्यांचा हा अपयशी प्रयत्न आहे अशीही टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भाजपचा विस्तार होतो आहे तो या लोकांना बघवत नाही. भाजपच्या विस्तारामुळे अनेक विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठतो आहे. आजची रॅली ही त्याचेच उदाहरण आहे असेही त्यांनी म्हटले. हे असले विरोधी पक्ष संविधानच्या मागे लपून आपले पक्ष वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत अशी टीका आज मुख्यमंत्र्यांनी केली.