News Flash

चौकशीबाबत मुख्यमंत्र्यांची विरोधी पक्षनेत्यांशी चर्चाच नाही

मेहता यांनी विकासकाला मदत व्हावी या उद्देशाने प्रकरण हाताळले होते.

काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील. (संग्रहित)

सुभाष देसाईही विरोधकांचे लक्ष्य

गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्या चौकशीची घोषणा करताना ही चौकशी कशी करायची याबाबत विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. पण चौकशीची घोषणा होऊन आठवडा उलटता तरी मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मेहता यांच्याबरोबरच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावरील आरोपांवरून उद्यापासून विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे. तर विरोधाची धार कमी करण्याकरिता मेहता यांची चौकशी कशी करायची याबाबतची घोषणा करून मुख्यमंत्री या वादावर उद्या पडदा पाडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मेहता यांनी विकासकाला मदत व्हावी या उद्देशाने प्रकरण हाताळले होते. विरोधी पक्षांनी आवाज उठविल्यानंतर गेल्या सोमवारी मुख्यमंत्र्यांनी मेहता यांची चौकशी करण्याची घोषणा केली. ही चौकशी कशी करायची याबाबत विरोधी पक्षनेते आणि गटनेत्यांशी चर्चा करण्यात येईल, असे जाहीर केले होते. गेल्या आठवडय़ात मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता विरोधकांनी विधिमंडळाच्या उभय सभागृहांचे कामकाज रोखले होते. तीन दिवसांच्या सुट्टीनंतर उद्यापासून पुन्हा कामकाजाला सुरुवात होत असून, विरोधकांकडून पुन्हा एकदा मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे. याशिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एका विकासकाला मदत व्हावी या उद्देशाने औद्योगिक विकास मंडळाची जमीन परत दिल्याचा मुद्दाही विरोधी पक्षाकडून तापविला जाणार असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले.

सरकार गंभीर आहे का ?

मेहता यांच्या गैरव्यवहारांची तीन प्रकरणे समोर आली आहेत. आणखी किती प्रकरणांची सरकार वाट पाहणार आहे आणि   मेहता यांच्या चौकशीला विलंब का लावला जात आहे, असा सवाल विखे-पाटील यांनी केला. सरकार गंभीर नाही, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2017 4:12 am

Web Title: cm devendra fadnavis opposition party leaders radhakrishna vikhe patil prakash mehta sra scam
Next Stories
1 मेट्रो ही रेल्वे की ट्रामवे?
2 खोत यांच्याकडून राजू शेट्टींचीच उलटतपासणी!
3 गुडघा शस्त्रक्रियेतील नफेखोरीला आळा
Just Now!
X