पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपचा दाखला देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूपच अहंकारी आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, विरोधीपक्षांबाबत अशा भाषेचा वापर मुख्यमंत्र्यांच्या तोंडी शोभत नाही, मुख्यमंत्री हे खूपच अहंकारी आहेत. आपण राजकारणात पाहिले आहे की, जेव्हा कुत्राही सत्तेत आल्यानंत स्वत:ला वाघ समजायला लागतो, अशा कठोर शब्दात राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली होती. यात फडणवीस यांनी साम-दाम-दंड- भेद याचा वापर करावा, असे म्हटल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. या कथित ऑडिओ क्लिपवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांकडून टीका होत होती.

दरम्यान, या क्लिपवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी वसईतील सभेत स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ती ऑडिओ क्लिप माझीच आहे. ती ऑडिओ क्लिप १४ मिनिटांची असली तरी शिवसेनेने ती मोडून-तोडून जनतेसमोर आणली. क्लिपची पहिली आणि शेवटची दोन वाक्ये ऐकवली असती तर शिवसेना तोंडघशी पडली असती. आता मी स्वत:च ही क्लिप निवडणूक आयोगाकडे देणार आहे. मी काही चुकीचे केले असेल तर निवडणूक आयोगाच्या कारवाईला सामोरे जाण्यास मी तयार आहे. पण मी निर्दोष सुटलो तर या क्लिपद्वारे जनतेची दिशाभूल करणाऱ्यांवरही कारवाई झालीच पाहिजे. आपला पराभव दिसू लागल्यानेच शिवसेना इतक्या खालच्या स्तराला गेल्याचा आरोपही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला.