राज्यपालांना सरकारी विमानाचा वापर करण्यास परवानगी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दौऱ्याच्या वेळी उड्डाणासाठी राजभवनचा वापर थांबविला आहे. याऐवजी महालक्ष्मी रेसकोर्सवरून मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरने शुक्रवारी उड्डाण केले.

मलबार हिल येथील राजभवनच्या हिरवळीवर हेलिपॅड तयार करण्यात आले आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री वा मंत्री सरकारी हेलिकॉप्टरने ये-जा करण्याकरिता राजभवनचा वापर करतात.

गेल्या आठवडय़ात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सरकारी विमान वापरण्यास मुख्यमंत्र्यांकडील सामान्य प्रशासन विभागाने परवानगी नाकारली होती. यामुळे राज्यपालांना सरकारी विमानात १५ मिनिटे थांबून खाली उतरावे लागले होते. राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजभवन मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर वापराच्या वेळी उट्टे काढण्याची भीती लक्षात घेऊनच मुख्यमंत्री कार्यालयाने सावधता बाळगली आहे.

दरम्यान, जून २०१३ ते जून २०१७ या काळात सरकारी हेलिकॉप्टरसाठी जुहू हेलिपॅडचा वापर केल्याबद्दल भारतील विमानतळ प्राधिकरणाचे प्रलंबित १ लाख ४१ हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

झाले काय?

राज्यपालांच्या विमानाचा प्रकार घडल्यावर मुख्यमंत्र्यांनी जव्हार आणि शिवनेरी या दोन दौऱ्यांच्या वेळी राजभवनमधून हेलिकॉप्टर उड्डाण करण्याचे टाळले. त्याऐवजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅडचा वापर करण्यात येत आहे. यापुढील काळात महालक्ष्मी रेसकोर्स किंवा जुहू विमानतळाचा वापर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री कार्यालयाने घेतला आहे. महालक्ष्मी रेसकोर्सवरील हेलिपॅड हे खासगी असून, उड्डाण व हेलिकॉप्टर उतरविण्याकरिता पैसे आकारले जातात.