|| संजय बापट

ऑनलाइन नोकरभरतीचा राज्य सरकारचा निर्णय

राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सहकारातील साम्राज्यावर गेल्या साडेतीन वर्षांत संधी मिळेल तेव्हा घाव घालणाऱ्या राज्य सरकारने आता दोन्ही काँग्रेसच्या वर्मावर घाव घालणारा आणखी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये आपले आप्तस्वकीयांचे मागच्या दाराने पुनर्वसन करण्याच्या किंवा या भरतीच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करण्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या मनसुब्यांवर पाणी फिरवताना यापुढे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरती ऑनलाइन पद्धतीनेच करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे.

राज्यातील बहुतांश जिल्हा बँका आजही राष्ट्रवादी- काँग्रेसच्या ताब्यात आहेत. एवढेच नव्हे, तर या बँकांमधील अधिकारी- कर्मचारीही त्या भागातील आमदार- नेते आणि संचालकांचे नातेवाईक किंवा कार्यकर्तेच असतात. त्यातूनच अनेक बँकांमध्ये प्रशासन आणि संचालकांच्या लागेबांध्यामुळेच मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. आजवर अनेक निवडणुकींत या जिल्हा बँका सर्वार्थाने आजही काँग्रेस-राष्ट्रवादीची साथसोबत करीत आहे. प्रशासकांच्या माध्यमातून राज्य सहकारी बँकेसह काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकावर सरकारने कब्जा केला असून, या बँका ताब्यात असल्याचा पक्ष वाढविण्यासाठी किती लाभ होतो याचाही अनुभव भाजपला ठिकठिकाणी येत आहे. त्यातूनच जिल्हा बँकांतील मागच्या दाराने होणारी घुसखोरी थांबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार जिल्हा बँकांमध्ये आजवर सुरू असलेली ऑफलाइन भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली असून  यापुढे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच नोकरभरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी संबंधित बँकांनी भरती प्रक्रिया राबविण्याचा अनुभव असलेल्या नोंदणीकृत नामांकित संस्थांची नियुक्ती करावी. ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करताना संबंधित संस्थेने कोणताही गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित संस्थेस लगेच काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच लेखी परीक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीस बोलविण्याची आवश्यकता असल्यास १:३ या प्रमाणात उमेदवार बोलवावेत मात्र त्यासाठी कोणत्या पदावरील उमेदवारांची तोंडी परीक्षा होणार हे जाहिरातीमध्येच बँकांना स्पष्ट करावे लागणार आहे. ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया राबविणाऱ्या संस्थेने ऑनलाइन परीक्षा झाली की लगेच बँकेच्या संकेतस्थळावर निकाल जाहीर करायचा असून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन उमेदवारांची निवड झाल्यावरच यादी बँकेला सोपविली जाणार आहे. या भरती प्रक्रिया सर्व जिल्हा बँकांना बंधनकारक करण्यात आली असून, याच्या बाहेर जाऊन एकाही बँकेस नोकरभरती करता येणार नसल्याचे सहकार विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.