वजनाने जड व आग लागल्यास मोठा पेट घेणाऱ्या शहाळ्यांचा टनावारी कचरा मुंबई शहरात जमा होतो. पण, या कचऱ्याचा पुनर्वापर करण्याचा चांगला उपक्रम पालिकेने राबवण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या बी-विभागात महिन्याला कचऱ्यातून जमा झालेल्या १५० टनांहून अधिक शाहळ्यांवर प्रक्रिया करण्यात येते. त्यामुळे क्षेपणभूमीवर जाणारा कचरा कमी करण्यासाठी हा चांगला उपक्रम राबवला जात आहे.

रुग्णालये, उद्याने आदींच्या बाहेर हमखास शहाळे विक्रेत्यांच्या गाडय़ा व ठेले उभे असतात. शहाळ्यातील पाणी कमी संपल्यावर ही रिकामी शहाळी पालिकेच्या कचऱ्यात टाकण्यात येतात. या शहाळ्यात ओलावा अधिक असून त्यांना आग लागल्यावर मोठय़ा प्रमाणात धूरदेखील होतो व त्यांचे वजन अधिक असल्याने कचऱ्याचा आकारही वाढतो. त्यामुळे यावर पर्यावरणपूरक तोडगा काढण्याचा निर्णय पालिकेच्या बी-विभागाने घेतला. या बी-विभागात जे.जे. हॉस्पिटलसह अन्य छोटी-मोठी रुग्णालये आहेत. या रुग्णालयांबाहेर अनेक शहाळी विक्रेते आहेत. या सर्व शहाळे विक्रेत्यांकडून रिकामी शहाळी बी-विभागाची विशेष गाडी गोळा करते.

कपडय़ांच्या कचऱ्यावरही उपाय

बी-विभागात कापडाचेही काही उद्योग असून दररोज वाया गेलेले व कापलेल्या कपडय़ांचा १५० किलो कचरा तयार होतो. हे कापडदेखील पुनर्वापरासाठी गोळा केले जाणार असून ते टेडी बेअर बनावणाऱ्या लघु उद्योगांना देण्यात येणार आहे, असेही शिरूरकर म्हणाले.

तयार कोकोपीट पदार्थाचा झाडांसाठी वापर

कर्नाक पुलाखाली नामदेव सावंत यांच्या सर्वेश इंडस्ट्रीजचे शहाळी प्रक्रिया केंद्र असून तेथे यंत्रामध्ये शहाळी टाकून त्यांचा बारीक धाग्यांसारखा चोथा तयार केला जातो. पुढे या चोथ्यापासून कोकोपीट हा पदार्थ बनवून त्याचा नर्सरीतील झाडांसाठी वापर करण्यात येतो. अशी माहिती बी-विभागातील साहाय्यक अभियंता अजय राणे यांनी दिली. ते म्हणाले की, शहाळ्यातील पाणी संपले तरी त्यात ओलावा कायम असतो. त्यामुळे त्यात ऑक्सिजनचेही प्रमाण अधिक असते. अशा वेळी आग लागल्यास शहाळी जास्त पेट घेतात. त्यामुळे हा उपक्रम आम्ही गेल्या जून महिन्यापासून सुरू केला. त्यामुळे आग भडकवण्यास कारणीभूत ठरणाऱ्या या शहाळ्यांवरील प्रक्रिया उपक्रमाचा कित्ता आता पालिकेच्या अन्य विभागांना गिरवावा लागणार असल्याचे दिसते.

बी-विभागात दररोज १६५ मेट्रिक टन कचरा तयार होतो. यातील ५ टन कचरा हा केवळ रिकाम्या शहाळ्यांचा असतो. म्हणूनच आम्ही त्यावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून देवनार कचराभूमीवर आमच्या विभागातून शहाळ्यांचा कचरा गेलेला नाही. तसेच, पालिकेत हा उपक्रम बी-विभागातच सुरू असून अन्य विभागांसाठी तो आदर्श ठरले.

– उदयकुमार शिरूरकर, साहाय्यक आयुक्त, मुंबई महानगरपालिका