News Flash

रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा- काँग्रेस

राम मंदिरासाठी निधी देणाऱ्या भाविकांना काँग्रेसचा इशारा

“अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणीसाठी देशपातळीवर राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टच्या माध्यमातून निधी गोळा केला जात आहे. पण या ट्रस्टबरोबरच भाजपा व आरएसएसदेखील घरोघरी जाऊन रोखीने पैसे गोळा करत आहेत. भारतीय जनता पक्ष, आरएसएसची पार्श्वभूमी पाहता या माध्यमातून भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची मोठी शक्यता आहे. हा पैसा भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या घरी किंवा भाजपाच्या पक्षनिधीसाठी वापरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जनतेने राम मंदिर निर्मितीसाठी आपला निधी राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टमध्ये थेट जाईल याची खबरदारी घ्यावी. तसेच आजवर भाजपा-आरएसएसमार्फत गोळा केलेला निधी सदर ट्रस्टलाच भाजपा-आरएसएसने पोहोचवला की नाही याची चौकशी राज्य सरकारने करावी”, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, “भाजपा-संघाकडून जनतेला लुबाडले जाण्याची शक्यता आहे”, असा इशाराही त्यांनी भाविकांनी दिला.

सचिन सावंत म्हणाले, “भाजपा व संघ परिवाराने राम मंदिराकरिता या अगोदरही निधी गोळा केला होता. त्याचे अद्याप काय झाले याची माहिती त्यांनी दिलेली नाही. राम मंदिरासाठी गेली अनेक वर्षे लढणाऱ्या निर्मोही आखाड्याने विश्व हिंदू परिषदेवर अयोध्या मंदिराकरिता जमा केलेले १४०० कोटी रुपये लुबाडल्याचा आरोप केला होता. अखिल भारतीय हिंदू महासभेने २०१५ साली विश्व हिंदू परिषदे तर्फे १४०० कोटी रुपये आणि अनेक क्विंटल सोने लुबाडले गेल्याचा आरोपही केला होता. त्याचेही उत्तर अजून संघ परिवारातर्फे दिले गेलेले नाही. या संदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेने पंतप्रधान कार्यालयाला ४ ऑगस्ट २०१७ रोजी तक्रार केली होती. पण याची चौकशी करण्याची तयारी भाजपाच्या कोणत्याही सरकारने दाखवलेली नाही.”

“राष्ट्रवादी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे, पण…”- जयंत पाटील

“४ जानेवारी २०२१ रोजी अखिल भारतीय हिंदू महासभेने भाजपातर्फे राम मंदिर निर्मितीकरता निधी गोळा करण्याच्या कार्यक्रमाचा विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाला अयोध्येत राम मंदिर कधीच नको होते आणि भाजपाकरिता हा केवळ राजकीय आणि पैसे कमावण्याचा कार्यक्रम आहे. गेल्या तीन दशकामध्ये भाजपाने जमा केलेल्या पैशाचा अजूनही हिशोब दिलेला नाही, असे हिंदू महासभेचे प्रवक्ते प्रमोद पंडित जोशी यांनी सांगितले आहे. राम मंदिरासाठी भाजपारुपी रावण पैसे गोळा करत आहे, असे म्हणून जर हे निधी संकलन जनतेमध्ये जाहीर केले नाही तर कोर्टात जाऊ, असा इशाराही प्रमोद पंडीत जोशी यांनी दिला आहे”, अशी माहिती सावंत यांनी दिली.

“या निधी संकलनादरम्यान अपहाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्या चिंताजनक आहेत. १० सप्टेंबर २०२० रोजी राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टमधून ६ लाख रुपये क्लोन चेकच्या माध्यमातून काढले गेले होते. १२ एप्रिल २०२० रोजी दिल्लीच्या एका युवकावर अयोध्येतील राम मंदिर पोलिस स्टेशनमध्ये खोट्या ट्रस्टच्या नावाने खोटी वेबसाईट काढून पैसे लुबाडल्याची देखील तक्रार दाखल करण्यात आली आहे. श्रीराम मंदिर निर्माण समर्पण निधी समितीचे मुरादाबाद येथील अध्यक्षांनी खोट्या पावत्या दाखवून राम मंदिराकरिता निधी गोळा करणाऱ्या ४ लोकांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पिलीभित येथे देखील ५ लोकांवर अशाच तऱ्हेने खोट्या संघटनेच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचा धंदा उघड झाला आहे. राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांनी देखील दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या नावाने खोटे ट्विटर, वेबसाईट बनवल्याची तक्रार केली आहे”, असं सावंत म्हणाले.

ठरलं… मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाणार अयोध्येला

“आरएसएससंबंधित ऑप-इंडिया या न्यूज पोर्टलने राम जन्मभूमी तिर्थक्षेत्रच्या नावाने घोटाळा केला जात असून अपहार करणाऱ्या १३ UPI ( United payment Interface) ची यादीच दिली असून त्या माध्यमातून आपल्याशी गैरव्यवहार होऊ शकतो असा इशारा देऊन काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. सूरत पोलिसांनी देखील अशाच प्रकारची कारवाई १६ जानेवारीला करून एका युवकाला पैसे गोळा करताना पकडले आहे. या पार्श्वभमीवर महाराष्ट्रात भाजपा आणि आरएसएसकडून मोठ्या प्रमाणात रोखीने पैसे गोळा केले जात आहे. यातून भगवान श्रीराम भाविकांची लुट होण्याची मोठी शक्यता आहे. या अनुषंगाने सदर पैसा राम मंदिराच्या निर्माण करताच निर्मीत झालेल्या ट्रस्टमध्ये जाईल याची जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन सदर ट्रस्टतर्फेही करण्यात आलेले आहे.त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जनतेला लुबाडण्यात येऊ नये या कारणाने भाजपा आरएसएसने गोळा केलेला निधी त्याच ट्रस्टमध्ये पोहोचला की नाही याची राज्य सरकारने चौकशी करावी”, अशी मागणीही सावंत यांनी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2021 5:54 pm

Web Title: collecting donations on the name of ram mandir is bjp new fraud alleges congress leader sachin sawant vjb 91
Next Stories
1 ठरलं… मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्येला जाणार
2 मुंबईकरांना मोठा दिलासा! एक फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल
3 मुंबईत एक्स्प्रेस हायवेवर एसटी उलटली; चालक फरार
Just Now!
X