लोकसभेत काँग्रेसची धूळधाण उडाल्याच्या पाश्र्वभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे लोढणे गळ्यात बांधून घेण्यास राष्ट्रवादी फारशी उत्साही नाही हाच संदेश पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी दिला. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी घेतली जात असताना आपल्या नावावर पक्षाकडून शिक्कामोर्तब व्हावे म्हणून अजितदादा उत्सुक असले तरी सामूहिक नेतृत्वाची कल्पना मांडून पवार यांनी पक्षांतर्गत वाद वाढणार नाही याची खबरदारी घेतली तसेच पुतण्याच्या महत्त्वाकांक्षेला आवर घातला.
राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून पक्षांतर्गत संघर्ष वाढणार नाही ही खबरदारी घेतली. निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादीने आपला नेता निवडावा, असे मत अजित पवार यांनी अलीकडेच व्यक्त केले होते. यामागे आपले घोडे पुढे दामटायचा त्यांचा हेतू होता. मात्र, पवारांनी रविवारी लगाम खेचला. ‘‘मी स्वत: मुख्यमंत्रिपद स्वीकारावे अशी मागणी पुढे केली जात आहे, पण मी राज्यात परत येणार नाही. पक्षात सामूहिक नेतृत्व असून, निवडून आलेले सदस्य नेता निवडतील,’’ असे ते म्हणाले. अजित पवारांचे नाव पुढे आल्यास राष्ट्रवादीतील जुने नेते त्यातून दुखावण्याची शक्यता लक्षात घेऊन पवार यांनी सामूहिक नेतृत्वाचा मध्यम मार्ग काढल्याची चर्चा आहे.
स्वबळावर लढण्याचा पर्याय खुला
लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे नेते नाके मुरडत असताना आघाडी कायम ठेवणार, असे पवार नेहमीच सांगत. वर्धापन दिन समारंभात शरद पवार, भास्कर जाधव किंवा अन्य कोणत्याही नेत्याने काँग्रेस किंवा आघाडीचा साधा उल्लेखही केला नाही. यावरून राष्ट्रवादी आघाडी करण्याबाबत फारशी उत्सुक नसल्याची चर्चा होती.