कवी अरुण म्हात्रे संमेलनाध्यक्ष
मुंबई मराठी साहित्य संघ आणि राम निरंजन झुनझुनवाला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वे महाविद्यालयीन साहित्य संमेलन ३ डिसेंबर रोजी घाटकोपर येथील झुनझुनवाला महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे हे संमेलनाचे अध्यक्ष असून अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
सकाळी दहा ते साडेपाच या वेळेत होणाऱ्या या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र सिंह व प्रा. शुभांगी वर्तक यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाच्या पहिल्या सत्रात सकाळी साडेअकरा वाजता ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या सत्रात दुपारी दोन वाजता ‘ब्रेन ड्रेन-स्वप्न आणि वास्तव’ या विषयावर परिसंवाद होणार असून यात डॉ. नरेंद्र जाधव, डॉ. अश्विनी भालेराव-गांधी, भूषण केळकर, प्रशांत कऱ्हाडे आणि महाविद्यालयी विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
दुपारी साडेतीन वाजता किरण येले यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या एक दिवसाच्या साहित्य संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.